
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह कळसुबाई शिखर परिसरातून शुक्रवारी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रात्री 9 वाजता कृष्णावंती नदीवरील 112 द.ल.घ.फू. क्षमतेचा वाकी लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो झाला.
वाकी तलावाच्या सांडव्यावरून पाणी प्रवरापात्रातून निळवंडे धरणात झेपावत आहे. त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ होत आहे. शनिवारी निळवंडे धरणात 1874 द.ल.घ.फू. (22.52 टक्के) पाणी होते. तर भंडारदरा धरणात 6350 द.ल.घ.फू. (58 टक्के) पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भंडारदऱयासह निळवंडे धरण जलदगतीने भरून पैठण येथील नाथसागर जलाशयात वाढ होईल. शनिवारी सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून रतनवाडी येथे 6 इंचाहून जास्त 155 मि.मी. पाऊस झाला, तर घाटघर 145 व भंडारदऱयात 137 मि.मी. पावसाची नोंद झाली.



























































