
मंडणगड येथील खेम धरण पूर्णपणे भरल्याने धरणातून ओसंडून वाहणा-या पाण्यात स्थानिक पर्यटक हे पर्यटनाचा चांगलाच आनंद लुटत आहेत. दापोली तालुक्यातील हर्णै या गावाची तहान भागवण्यासाठी गावाला लागूनच असलेल्या अडखळ गावाच्या हद्दीत खेम नावाचे धरण आहे. या धरणातून जानेवारी अखेरपर्यंत हर्णे गावाला पाण्याचा पुरवठा होतो. सध्या हे धरण पाण्याने पुर्णपणे भरले आहे. त्यामुळे धरणाच्या भिंतीवरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.
या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात मनसोक्त डूंबण्याचा आनंद सध्या स्थानिक लोक घेत आहेत. यामध्ये हर्णै या गावाबाहेरील हौसे गवसे नवसे अधिक जात असून आनंद घेण्यासोबतच येथे पार्ट्या झडत असतात मोठया संख्येने लोक खेम धरणाच्या ठिकाणी येत असल्याने या ठिकाणी धरण परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळतो. त्या शिवाय जेवणावळी झालेल्या पार्ट्यांच्या पत्रावळ्या, पाणी पिण्यासाठी वापरलेली प्लॅस्टिकची ग्लास, चकणा म्हणून शेंगदाणे, चणे, वेफर्स, मुगडाळ आदी खाऊन टाकलेली प्लॅस्टिकच्या पिशव्यांची वेष्टने या धरण परिसरात टाकण्याचा प्रकार अधिक वाढला आहे.


























































