
गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरणक्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू असल्याने नद्या, ओढय़ा-नाल्यांना पूर आला आहे. दोन दिवसांत पंचगंगेच्या पाणीपातळीत तब्बल 10 फुटांनी वाढ झाली असून, कोणत्याही क्षणी पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. काल सकाळी 17 फुटांवर असलेली पंचगंगेची पाणीपातळी आज सायंकाळी सहाच्या सुमारास 28 फूट 3 इंचांवर गेली होती. नदीची इशारापातळी 39, तर धोकापातळी 43 फूट आहे. 49 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. जिह्यात दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 98.1 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरण 60 टक्के भरले आहे.
कोल्हापूर जिह्यातील राधानगरीसह महत्त्वाची धरणे 30 ते 60 टक्के भरली आहेत. लहान, मध्यम व मोठी अशा एकूण 91.81 टीएमसी क्षमतेच्या 15 धरण प्रकल्पांत सध्या एकूण 40.26 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या राधानगरीत 60 टक्के पाणीसाठा असून, 700 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच तुळशी 31, वारणा 49, दूधगंगा (काळम्मावाडी) 25, कासारी 50.67, कडवी 52.36, कुंभी 59.33, पाटगाव 47.18, चिकोत्रा 32.87, चित्री 30.78, जंगमहट्टी 33.43, जांबरे 93, आंबेओहोळ 33.74, तर घटप्रभा आणि कोदे लपा 100 टक्के भरली आहेत. वारणातून 400 क्युसेक, घटप्रभातून 4765, जांबरे 130 आणि कोदेमधून 1144 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली
– पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ; भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे; कासारी नदीवरील यवलूज; हिरण्यकेशी नदीवरील साळगाव; घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे; वेदगंगा नदीवरील निळपण व वाघापूर; कुंभी नदीवरील कळे व शेनवडे; वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव आदी 47 बंधारे पाण्याखाली गेले होते.
गगनबावडा येथे सर्वाधिक 98.1 मि.मी. पावसाची नोंद
– गेल्या 24 तासांत जिह्यात हातकणंगले 17 मि.मी., शिरोळ 15.8, पन्हाळा 44.7, शाहूवाडी 47.2, राधानगरी 47.8, करवीर 34, कागल व गडहिंग्लज प्रत्येकी 35.3, भुदरगड 63.5, आजरा 64, तर चंदगड तालुक्यात 73.4 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. गगनबावडा परिसरात सर्वाधिक 98.1 मि.मी. पाऊस झाला.
रांगणा किल्ल्यासह नाईकवाडी, सवतकडा, तोरसकरवाडी धबधबे पर्यटनासाठी बंद
– सोमवारी भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या आणि अडकून पडलेल्या 17 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळा संपेपर्यंत रांगणा किल्ल्यासह शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी, दोनवडे येथील सवतकडा, तसेच नितवडे येथील तोरसकरवाडी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनास नागरिकांना प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. भुदरगड तालुका आपत्तिव्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी वरुटे-अडसूळ यांनी ही माहिती दिली आहे.
आजऱयात संततधार; साळगाव, किटवडे बंधाऱयांवरून पाणी
आजरा तालुक्यात संततधार पावसामुळे हिरण्यकेशीवरील किटवडे आणि साळगाव बंधारे ओव्हरफ्लो झाले असून, या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. रात्री या बंधाऱयावरून पाणी वाहू लागले. किटवडे परिसरात सुमारे 247 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चित्री प्रकल्प पाणलोटक्षेत्रातही अतिवृष्टी होऊन 113 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. आज सकाळी प्रकल्पातील पाणीसाठा 31 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती आजरा पाटबंधारे शाखेचे अभियंता श्रीकांत पाटील यांनी दिली. चित्री 31 टक्के, तर आंबेओहोळ आणि उचंगी प्रकल्पांत 34 टक्के पाणीसाठा झाला.


























































