
>> रश्मी वारंग
पावसाने असा जोर धरल्यावर आपल्या पोतडीतील गरमागरम पाककृती बाहेर यायला लागतात. थंडगार हवेला उबदार करणारे सूप म्हणजे जगभरातील खवय्यांसाठी पौष्टिक पर्याय. त्याच सूपची ही गरमागरम कहाणी.
माणसाच्या उक्रांतीपासून खाल्ला गेलेला, किंबहुना प्यायला गेलेला पदार्थ म्हणून सूपचा उल्लेख करता येईल. मांस किंवा धान्य यांचे सत्त्व पाण्यात उतरेपर्यंत उकळून ते कढण आदिमानवही पित असे. भांडी बनवण्याची कला विकसित होत असताना मानवाने अन्नावर जे प्रयोग केले त्याचाच हा एक भाग म्हणता येईल.
आपल्या संस्कृतीत पाककलेला सूपशास्त्र म्हटले गेले असले तरी आपण पित असलेल्या सूपशी त्याचा संबंध नाही. सूप हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. फ्रेंच मंडळी धान्य वा मांसाचे कढण ब्रेडवर ओतत अथवा तो ब्रेड या कढणात किंवा रश्श्यात बुडवून खात. त्या पदार्थाला सूप म्हटले जाई.
17 व्या शतकात फ्रेंच मंडळींनी ‘रेस्तराँ’ ही संकल्पना प्रचलित केली. दिवसभर कष्ट करून दमल्या-भागल्या जिवांना त्यांची ऊर्जा ‘रिस्टोर’ करणारे, ऊर्जा परत मिळवून देणारे पदार्थ इथे मिळत. त्या पदार्थांमध्ये सूप हा अतिशय महत्त्वाचा पदार्थ होता. पौष्टिक पदार्थ म्हणून सूपची लोकप्रियता तेव्हापासून आहे. गंमत म्हणजे राजदरबारातील स्त्रियांमध्ये हे सूप विशेष लोकप्रिय होते. पदार्थ चावून खाल्ला तर चेहऱयाला सुरकत्या पडतात अशी त्या काळातील बायकांची समजूत होती. त्यामुळे खाण्याऐवजी खूप सारी ऊर्जा देणारा हा पेय पदार्थ त्यांच्यात लोकप्रिय होता. 18 व्या शतकात सोयीसाठी कॅनमधून सूपची विक्री सुरू झाली आणि घरी बनवण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेऐवजी तयार झटपट सूप पिता येऊ लागले.
जगभरात स्थानिक पातळीवर मिळणाऱया पदार्थांचा वापर करून वेगवेगळय़ा प्रकारची सूप बनवली जातात. सर्वात लोकप्रिय सूपमध्ये ‘टोमॅटो सूप’चा समावेश करता येतो. प्रांतागणिक टोमॅटो ही गोष्ट सोडता खूप वेगवेगळे घटक वापरून ‘टोमॅटो सूप’ बनवले जाते. या सूपसोबत काही इंग्रजी म्हणी, वाक्प्रचार जोडले गेले आहेत. जसे की, ‘डक सूप.’ मराठीत आपण जसे ‘हातचा मळ’ म्हणतो, तसे हे ‘डक सूप.’ हे सूप बनवायला अगदी सोपे असल्याने एखाद्या सोप्या गोष्टीसाठी हा शब्दप्रयोग होतो. सूपशी जोडलेला अन्य एक वाक्प्रचार म्हणजे ‘फ्रॉम सूप टू नटस्’. म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. जेवताना सूप सगळय़ात पहिले प्यायले जाते. त्यामुळे असा उल्लेख केला जातो. लंडनमध्ये धुके किती दाट आहे हे दर्शविण्यासाठी ‘पी सूप फॉग’ असा शब्दप्रयोग होतो. त्याचा अर्थ अगदी दाट धुके.
मुख्य जेवणाआधी वाढला जाणारा, आपला जठराग्नी प्रज्वलित करणारा, आजारपणात पौष्टिकपणा देणारा पूरक पदार्थ ही सूपची ओळख आहे, पण जशी नाटकातील नांदी रंगली की, पुढचे नाटक झकास पार पडणार याची रसिकांना खात्री होते तसेच उत्तम सूप पुढच्या दर्जेदार जेवणाची दवंडीच खवय्यांसाठी घेऊन येते हे नक्की.
जगभरात वैविध्यपूर्ण प्रकार
जगभरातील प्रसिद्ध सूप हिंदुस्थानींना तितकेसे परिचित नाहीत. मात्र बऱयाचदा हॉटेलमध्ये गेल्यावर चायनीज सूपच्या गटातील ‘मंचाव सूप’ आपण पितो. ‘मंचाव सूप’चा उगम चक्क मेघालयातील आहे. व्यापारामुळे अनेक चिनी व्यापारी हिंदुस्थानात ये-जा करत. त्यांच्या आवडीचं काही बनवताना चिनी आणि हिंदुस्थानी आहारातील पदार्थ निवडून हे सूप बनवण्यात आलं. न्यूझीलंडचं ‘चावडर सूप’ दूध वा क्रीमचा वापर करून तयार होते. स्पॅनिश ‘गझपाचो सूप’ कच्च्या भाज्यांपासून तयार होतं आणि ते गरमागरम नाही, तर थंडच वाढलं जातं. रशियन बॉर्शमध्ये बीटरूट्सचा वापर मुख्य असतो. फ्रेंच ‘अनियन सूप’ जगातील सर्वोत्तम सूपपैकी एक मानले जाते.



























































