
वेळोवेळी पदरात दान घालणाऱ्या व्यक्तींविषयी सांगतोय अभिनेता अक्षय शिंपी…
अभिनयच करायचा असे लहानपणापासून मी ठरवल्यावर, त्याचे प्रशिक्षण घ्यायचे हेसुद्धा मला घरून सांगितले गेले. आमच्या घरात शिक्षणाचा आग्रह होता. कुठलीही गोष्ट प्रशिक्षणाशिवाय करायची नाही असा दंडक होता. त्यामुळे मी नाटय़प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम शोधायला लागलो. त्याचदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल विभागाच्या नाटय़प्रशिक्षणाची पहिली तुकडी ठाणे जिह्यातल्या कल्याण तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर होणार होती. दिवंगत ज्येष्ठ नेपथ्यकार बापू लिमये या तुकडीचे समन्वयक होते. या अभ्यासक्रमाची बातमी वर्तमानपत्रात वाचून एका संध्याकाळी आजोबांबरोबर मी बापू लिमये यांच्याकडे गेलो. त्यांनी माझी चौकशी केली, काही जुजबी प्रश्न विचारले. या प्रशिक्षणासाठी वय वर्षे 18 पूर्ण असणे अपेक्षित होते. पण मी होतो 15 वर्षांचा. त्यामुळे मला प्रवेश घेता येणार नव्हता. मी खाली मान घालून तिथून निघालो. दुसऱया दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर या अभ्यासक्रमासाठी अपवाद करून मला प्रवेश दिल्याचे आजोबांनी सांगितले. मला प्रचंड आनंद झाला. हे माझे पहिलेच औपचारिक नाटय़प्रशिक्षण होते. रंगभूमीवर कार्यरत असणारे महत्त्वाचे रंगकर्मी तिथे येऊन शिकवणार होते. हे सगळे अनुभवता येणार असल्याने मी अतिशय आनंदात होतो. त्यावेळी जर हे दान पदरात पडले नसते तर आज चित्र वेगळे असते.
आपल्या जगण्याच्या प्रवाहात अनेकजण कितीतरी गोष्टींचे दान आपल्या पदरात घालत असतात आणि त्यामुळेच आपल्या जगण्याच्या प्रवाहाला घाट मिळत जातो; आपण समृद्ध होत जातो. प्रख्यात आणि विचारी अभिनेत्री छाया कदम म्हणजे सतत प्रयोग करत राहणारी अदाकारा! त्यांचे काम बघणे हाच अभिनयाचा एक महत्त्वाचा रियाझ असतो. माझ्या आयुष्यात त्या फक्त अभिनेत्री म्हणून नाहीत; तर माझी छायाताई ही माझी ‘मुंबईतली आई’ आहे. माझ्यावर निखळ जीव आहे त्यांचा! कुठलीही अडचण आली की मी हक्काने ज्या मोजक्या लोकांना साद घालू शकतो, त्यात छायाताई आहेत. ‘हिजडा’ या वेब-मालिकेसाठी आम्ही पहिल्यांदा सहकलाकार म्हणून एकत्र काम केले. पण आम्ही केवळ सहकलाकार राहिलो नाही; तर आमचे घट्ट मैत्रही जुळले. कोरोनाच्या दुसऱया लाटेत मी कोविडग्रस्त झालो होतो. गोरेगावातल्या नेस्को कोविड केअर सेंटरमध्ये मी भरती होतो. ऑक्सिजन लावला होता. या काळात किती-किती जणांकरवी छायाताई माझ्या तब्येतीची खबरबात घ्यायच्या त्याला गणतीच नाही. मी फोनवर बोलू शकत नव्हतो म्हणून त्या मला मेसेज करून तब्येतीची चौकशी करायच्या. गोरेगावातल्याच आमच्या दोघांच्या ओळखीतल्या मित्रांकरवी त्यांनी मला खूप मदत केली. आजही कुठली अडचण आली की मदतीसाठी त्या जिवाचा आटापिटा करून घेतात. अशी माणसे आयुष्यात असतात; त्यामुळे आपले जगणे सुकर होत असते. आपलाही हात ‘देता’ होत असतो. या दानातून आपण उतराई कसे होणार? आपण फक्त कृतज्ञ असावे.
‘दास्तानगोई’ या उर्दू कलाप्रकाराचे मराठीकरण करण्याचा प्रयोग मी सध्या रंगभूमीवर करतोय. या प्रयोगाने मला खूप काही दिले. मराठीतली पहिली दास्तानगोई म्हणजे ‘दास्तान-ए-बड़ी बांका’. तर कोविड काळातून मी बाहेर पडत असताना, काम थंडावल्यामुळे आर्थिक चणचण भेडसावत होती. दर महिन्याचे भाडे आणि इतर देयके भरण्यासाठी पैसे प्राधान्याने बाजूला काढावे लागतात. त्या काळात कामे मोजकीच असल्याने पुढच्या महिन्याचे भाडे कसे भरावे, हा विचार मेंदू कुरतडत होता. त्याचवेळी एक घटना घडली. पुण्यात सुदर्शनसमीप एका नाटय़गृहात आमचा हा प्रयोग रंगला होता. या प्रयोगाला तिकीट नव्हते. स्वेच्छामूल्य प्रयोग होता. प्रयोग संपला आणि एका सद्गृहस्थाने येऊन मला घट्ट मिठी मारली. सोबतच एक वजनदार पाकीट माझ्या हातात ठेवून ते अदृश्य झाले. प्रयोगानंतर प्रेक्षकांना भेटून, सगळी आवराआवर करून मी ते पाकीट उघडले तर त्यात चक्क दहा हजार रुपये होते. ते आयोजक नव्हते किंवा त्यांची यापूर्वी कधी भेटही झाली नव्हती. प्रयोगाची आणि कलावंतांची कदर ही भरभक्कम बिदागी देऊन त्यांनी केली होती. वास्तविक, एक हजार रुपयेही त्या दिवसांत खूप मोठे होते. या प्रयोगानंतर तर चक्क महिन्याचे भाडे माझ्या हातात होते. काय बोलावे ते मला कळेना! त्यांना अंदाज आला असावा का? त्यांनी माझे मन वाचले असावे का? कोविड काळात तर सगळय़ांचेच हात दगडाखाली होते. त्यांनी स्वतःची गैरसोय करून ही बिदागी दिली असेल का?’, असे अनंत प्रश्न माझ्या मनात होते आणि उत्तरादाखल, केवळ कृतज्ञतेची भावना तुडुंब नदीसारखी भरून वाहत होती…!
शब्दांकन : राज चिंचणकर



























































