
‘नाडा’ने 2023 सालच्या गेल्या पाच महिन्यांतील डोप टेस्ट चाचणीचा आपला अहवाल जाहीर केला असून हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची सर्वाधिक वेळा डोप टेस्ट झाल्याचे अहवालात समोर आले आहे. ‘नाडा’ने जाडेजाची एकूण तीनवेळा डोप टेस्ट घेतली असून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची एकदाही डोप टेस्ट झाली नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या पाच महिन्यांत ‘नाडा’ने एकूण 55 क्रिकेटपटूंची डोप टेस्ट घेतल्याचे सांगितले आहे. मात्र यापैकी निम्मे नमुने स्पर्धेच्या बाहेर घेण्यात आले आहेत. तसेच एकूण 58 पुरुष आणि महिलांचे नमुने घेण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा क्रिकेटपटूंची मोठय़ा संख्येने चाचणी होण्याची शक्यता आहे.
‘नाडा’च्या आकडय़ांनुसार 2021 आणि 2022 मध्ये अनुक्रमे 54 आणि 60 खेळाडूंचे सॅम्पल घेण्यात आले होते. यंदा घेण्यात आलेली चाचणी ही आयपीएल स्पर्धेदरम्यान घेण्यात आली आहे. त्यामुळे यात हिंदुस्थानी खेळाडूंसह परदेशी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

























































