
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लवकरच संपूर्ण हिंदुस्थान एकत्र येऊन मोदी सरकारची हुकूमशाही उलथवून टाकेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच हुकूमशाही आणि खोक्यांच्या राजकारणाविरुद्ध पुन्हा ‘चले जाव’चा नारा देऊया, असे आवाहनही त्यांनी केले.
आदित्य ठाकरे यांनी आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहीदांना अभिवादन केले. याबरोबरच त्यांनी ट्विटरवरून मोदी सरकारच्या हुकूमशाही आणि गुलामगिरीच्या मानसिकतेवरही प्रहार केला. ‘आजच्याच दिवशी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध निकराचा लढा देण्यासाठी सारे हिंदुस्थानी एकत्र आले आणि ‘चले जाव’चा नारा देशभर घुमला. या लढय़ाने हिंदुस्थानचं स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात आलं. आज पुन्हा एकदा ‘चले जाव’ चा नारा देऊया… हुकूमशाही राजवटीविरुद्ध, खोक्यांच्या राजकारणाविरुद्ध! आता तो दिवस दूर नाही, जेव्हा सारा भारत एकत्र येईल आणि ही हुकूमशाही उलथवून देईल! INDIA विजयी होईल!’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
अडानी हटाव, धारावी बचाव
मिंधे सरकारने धारावीच्या पुनर्विकासासाठी नेमलेल्या अडानीविरोधात बुधवारी 50 हजारांहून जास्त धारावीकर रस्त्यावर उतरले. एन. शिवराज मैदानावर झालेल्या सभेत ‘अडानी हटाव, धारावी बचाव’चा नारा देत शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 12 राजकीय पक्ष, विविध स्वयंसेवी संस्था, 200 हून जास्त संघटना, मंडळेही सहभागी झाली होती.

























































