मराठा आरक्षणासाठी मंचर शहरात कडकडीत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maratha-protest

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करत आंबेगाव तालुक्यात आज सर्वत्र बंद पाळण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंचर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मंचर येथे घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी केली.

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज तालुका बंदची हाक देण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक गावांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवले. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मंचर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. मुस्लिम बांधवांनी व व्यापारी वर्गांनेही पाठिंबा दर्शवला. मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय कार्यकर्ते जमले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. सुनील बांगर, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंतराव बाणखेले, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक अविनाश राहणे, जिल्हा संघटक राजाराम बाणखेले, देवदत्त निकम यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी केली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते अनेक मुस्लिम बांधव व व्यापारी उपस्थित होते. दरम्यान बंदमुळे मंचर शहरात दिवसभर शुकशुकाट पसरला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार पूर्णपणे बंद होते. पुणे नाशिक महामार्गावरून वाहनांची वर्दळ कमी होती. बंद यशस्वी झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.