
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी मध्यरात्री तीन ते सकाळी सातवाजेपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे ऊस, बटाटा, मिरची, वांगी, गवार यासह अनेक तरकारी पिकांचा व जनावरांच्या चारा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या मोसमातील सर्वात मोठा पाऊस काल मध्यरात्री झाला असल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
चालू वर्षाचा पावसाळा चालू होऊन तीन महिने होऊन अद्याप एकही चांगला पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत होता तर पूर्व भागातील पावसाअभावी अनेक नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या, सर्व तरकारी भाजीपाला सुकू लागला होता परंतु शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊस, बटाटा, बाजरी, सोयाबीन, भाजीपाला, तरकारी पीके, जनावरांचा हिरवा चारा यांचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मार्गी लागला आहे. अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, पारगाव, निरगुडसर,लोणी धामणी या सह सर्व गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अजूनही जोरदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
























































