
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मिंधे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलावर असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे 14 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. वास्तविक 40 आमदारांची सुनावणी हे 40 तासांचं काम आहे. पण, विधानसभा अध्यक्ष फुटलेले आहेत त्यामुळे ते वेळकाढूपणा करताहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई येथे माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, खरं म्हणजे 40 आमदारांची सुनावणी घेणं हे 40 तासांचं काम आहे. प्रत्येकाने बेईमानी केली आहे, प्रत्येकाने एका पक्षावर निवडून येऊन पक्षांतर केलं आहे. घटनेत अशा प्रकारच्या फुटीला मान्यता नाही. त्यांच्याकडे कोणतंही ठोस, सबळ कारण नाही, अशा वेळेला इतका वेळ का लागावा. खरं म्हणजे विधानसभा अध्यक्ष फुटलेले आहेत, म्हणूनच इतका वेळ लागतोय. न्यायालयाचा अपात्र ठरण्याचा स्पष्ट निर्देश असूनही विधानसभा अध्यक्ष आपल्या अधिकाराचा बाऊ करून जर वेळकाढूपणा करत असतील तर ते संविधानाशी, घटनेशी द्रोह करताहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ रविवारी जळगावात धडाडणार आहे. पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जळगाव महापालिकेतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून मानराज पार्क मैदानावर दुपारी 1 वाजता वचनपूर्ती सभा होणार आहे. या सभेला परवानगी नाकारल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, या सभेवेळी जळगावात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर करायची असेल, वाद निर्माण करायचे असतील तर सरकार यात आडकाठी घालेल. पण मला वाटत नाही की सरकारची ही भूमिका असेल. कारण कुठल्यातरी डेप्युटी सेक्रेटरीने अशा प्रकारचं पत्र काढलंय. त्यांनी आधी महानगर पालिकेसंदर्भातील नियम कायदे शिकून घ्यावेत आणि मग अशी पत्रकं काढावीत. आम्ही चाललो आहोत. हजारोंच्या संख्येने तिथे शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता जमणार आहे. आम्हाला कुणी थांबवू शकतं का महाराष्ट्रात? थांबवण्याचे प्रयत्न करतात ते तोंडावर पडतात. तुम्ही जरूर थांबवण्याचा प्रयत्न करा. मग महाराष्ट्रातील जनतेचा जनमानस काय आहे, हे जळगावात गेल्यावर कळेल, असं राऊत यावेळी म्हणाले.




























































