आता कोर्टच 16 आमदारांना अपात्र करेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांना दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागत आहे. ही चर्चा दिल्ली ऐवजी कोर्टात झाली तर निकाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागणार आहे. मात्र स्वत:ला आणि या अपात्र होणाऱ्या आमदारांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज येथे केली. कल्याण पश्चिमेत असलेल्या तीन टाईम हॉटेलच्या सभागृहात इंडिया आघाडीची सभा आज पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना रोहित पवार यांनी मिंधे आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार आहे. हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर त्याचे सर्व खापर भाजपवर फुटणार आहे. म्हणून ते निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आता हा निर्णय कोर्टाच्या माध्यमातूनच येणार आहे, असा विश्वासही यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महेश तपासे, सचिन बासरे, रवींद्र कपोते, सचिन पोटे, धनंजय जोगदंड, आदी उपस्थित होते.