
मध्य प्रदेशचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाणाऱ्या उज्जैन येथे एक लाजीरवाणी आणि संतापजनक घटना घडली आहे. एका 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला असून मदतीसाठी ती अर्धनग्न, रक्तबंबाळ अवस्थेत 8 किमी फिरली. मात्र, कुणीही मदत न केल्याने ती बेशुद्ध पडली. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे.
ही घटना बडनगर येथील मुरलीपुरा येथे घडली आहे. मंगळवारी ही पीडिता जवळपास अडीच तास या परिसरात मदत मागत फिरताना आढळली. तिच्या अंगावरील कपडे फाटले होते. अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत ती मदत मागत फिरत होती. काही लोकांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र, तिचं बोलणं कुणालाही कळलं नाही. अखेर ती बेशुद्ध पडल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
वैद्यकीय अहवालानुसार या मुलीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तिच्या खासगी अवयवांना जखमा झाल्या आहेत. त्यामुळे झालेल्या रक्तस्रावामुळे तिची प्रकृती गंभीर झाली होती. एका पोलीस कर्मचाऱ्याने रक्तदान करून तिचा जीव वाचवला. सध्या तिला इंदूर येथील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडिता उत्तर प्रदेश किंवा बिहार राज्यातील असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अद्याप या प्रकरणात आरोपींची ओळख पटलेली नाही.


























































