चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी देशातील आगामी परिस्थितीवर भाष्य केलं होतं. देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवल्या जाऊ शकतात, अराजकता वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यावरून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. राणे यांच्या विधानाला चोख प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी चिंधीचोराने माझ्याशी वाद घालू नये, असं म्हटलं आहे.

देशात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या आधी अराजकता वाढेल, अशी शक्यता वर्तवली होती. देशात दिवाळीनंतर कत्तल की रात असेल. सगळीकडे पूर्णतः अराजकता माजलेली दिसेल. निवडणुकीच्या आधी जी परिस्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती, तशी परिस्थिती निर्माण केली जाईल, असं म्हणतानाच त्यांनी कुणीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मतदान होईपर्यंत शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी सामान्य जनतेला केलं होतं.

आंबेडकर यांच्या या आवाहनानंतर नारायण राणे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी राणे यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी आपल्या देशातील अनेक अधिकारी हे बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे जनक मानतात. तेच अधिकारी मला ही माहिती देत असतात. तेच अधिकारी मला ही माहिती देत असतात. देशात अशी कुठलीही घटना घडू नये ही त्यांची अपेक्षा असते, म्हणूनच ते मला याची माहिती देतात. मी त्या नारायण राणेंना एवढंच सांगतो, त्या चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये, असं चोख प्रत्युत्तर आंबेडकर यांनी दिलं आहे.