
>> संजय मोने
आजचा आपला नायक आहे निरंजन दासोपंत खेबुडकर, पण सगळे त्याला रंजनच म्हणतात. हा रंजन तो चांगला शिकलेला आहे. स्वतचा छोटासा व्यवसाय आहे. आता काय व्यवसाय करतो ते माहीत नाही, पण भरपूर मोकळा वेळ असतो त्याच्याकडे आणि हा सगळा वेळ तो विविध नाक्यांवर घालवत असतो. अर्धा-अर्धा चहा, एखादी धुरकांडी यावर त्याचे दोन-तीन तास सहज निघून जातात. मग अचानक त्याला फोन येतो आणि तो गाडी सुरू करून निघून जातो. आता या दोन-तीन तासांत तो काय करतो? तर…
एका गल्लीच्या टोकावर असलेल्या चहाच्या दुकानाबाहेरचं स्थळ. कुठे त्याला कुठे ठेला म्हणतात, कुठे टपरी, कुठे नाकाही म्हणतात. एवढंच काय कुठे कुठे त्याला अड्डाही म्हणतात. शहरागणिक नावं बदलत राहतात, पण वर्दळ साधारण तीच असते. त्या ठिकाणच्या वेळेनुसार वयोगट बदलत राहतो. सकाळी वेगळा वयोगट, दुपारी वेगळा आणि पार मध्यरात्रीपर्यंत थांबणारा अजून आगळा. गप्पा साधारण या छापाच्या…
“तुम्हाला सांगतो भाऊ!” (किंवा ‘भैया’, अगदी ‘राव’सुद्धा किंवा ‘भो’ही. अशा संबोधनाने विषय सुरू होतो. साधारण मजकूर तोच असतो). निवृत्त असतील तर गुंतवून ठेवलेल्या रकमेवरचे व्याज कमी होत चालले आहे ही काळजी किंवा “च्यायला! फिक्सच्या खात्यावरचे व्याज कमी कमीच होतंय! अशाने आपल्यालाच त्यांना पैसे द्यायला लागणार काही वर्षांनी.”
“जपान की कुठेतरी असंच आहे म्हणे.”
“तुम्ही कधी गेला होता जपानला? कॉलेजात असताना ‘लव इन टोकियो’ बघितला असेल तेवढंच तुमचं जपानचं ज्ञान.”
“मैं पयल्या छूट सांगितलं होतं, फार्मामध्ये नाखो पैसा! एफडय़ा काय देतात? चार किंवा पाच टका? त्यांनी काय होतंय? पण तुमी मराटी लोक घाबरट.” कोणीतरी उत्तम मराठी बोलणारा अमराठी माणूस.
“साला चार वर्षांत डबल करतो म्हणून पैसा टाकला. आठ वर्षं झाली. डबल. च्यायला! हाव वाढली, सगळे परत गुंतवले. आता काही नाही. ऑफिस बंद.”
“काय सांगता? जाऊन थोबाड फोडायचं त्याचं!”
“त्यासाठीच गेलो. म्हणाला, “आधी पाच जण येऊन गेले, तुम्ही सहावे. हे घ्या! फोडा!” काय बोलणार? परत आलो. नशीब फालतू, अब क्या करेगा तू?”
हे असे संवाद एका ठिकाणी चाललेले असतात. चहावाला चहा भरत असतो. लोक पीत असतात. त्याच वेळी बाजूला…
“घास घास घासली. चारवेळा बसलो. आता कलेक्टर सोडा, तिकीट कलेक्टर झालो तरी भरून पावलं.” किंवा “नाही रे! च्यायला बघत पण नाही. तो साला डोळ्यावर सोडावॉटरच्या काचा लावणारा तिला आवडतो! हुशार आहे ना! मजबूत करीयर करणार तो आणि ती त्याच्याशी लग्न करून आयुष्य बरबाद करून घेणार!”
“तुझ्याशी लग्न करून बरबाद होणार नाही याची काय गॅरण्टी? तू तर नुसता वाऱया करतोयस. केटय़ा सोडवताना किती वर्षं लागतील, कोणाला माहीत? मग नोकरी करणार, त्यानंतर सेटल होणार. कधी पस्तिसाव्या वर्षी? तोपर्यंत तिनं थांबायचं?”
“कोण बोलतो थांबायचं? आपण पुढच्या वर्षी सीरियल किंवा सिनेमात काम करणार! तिथे शिक्षण वगैरे फालतू गोष्टी लागत नाहीत. च्यायला तीन वर्षांत करोडो कमावणार. साला! एकदा नुसतं बघू दे माझ्याकडे! साला फाटकन पटवून टाकतो.”
हेही स्वप्नरंजन तिथे चालू असतं. स्वप्नरंजनावरून सांगतो, आजचा आपला नायक आहे निरंजन दासोपंत खेबुडकर, पण सगळे त्याला रंजनच म्हणतात. इंग्रजीत क्हा मध्ये ‘क’ अक्षराचा उच्चार करत नाहीत, तसं याच्या नावातल्या ‘नि’ या अक्षराचा उच्चार होत नाही. फक्त ‘रंजन’. तर हा रंजन चांगला शिकलेला आहे. स्वतचा छोटासा व्यवसाय आहे, घर आहे चांगलं पाच-सहा खोल्यांचं. त्याचे मित्र म्हणतात, बापकमाईचं आहे, असेल, पण अशा बापाच्या पोटी जन्माला यायचं ही निर्विवादपणे त्याची स्वकमाई आहे. गाडी आहे चारचाकी. कारण पुण्यात दोन चाकी वाहनांनासुद्धा गाडी म्हणतात. काय करतो व्यवसाय, माहीत नाही, पण भरपूर मोकळा वेळ असतो त्याच्याकडे आणि हा सगळा वेळ तो वर सांगितलेल्या विविध नाक्यांवर घालवत असतो. अर्धा-अर्धा चहा, एखादी धुरकांडी यावर त्याचे दोन-तीन तास सहज निघून जातात. मग अचानक त्याला फोन येतो आणि तो गाडी सुरू करून निघून जातो. आता या दोन-तीन तासांत तो काय करतो, तर जमलेले इतर अनोळखी लोक सतत करवादत असतात. त्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस करतो. प्रथम सगळे त्याला दाद देत नाहीत, उडवून लावतात, पण तो हिंमत हरत नाही. त्याच्या काही क्लृप्त्या आहेत. म्हणजे जरा वयस्क माणूस कमी होणाऱया व्याजदरावर बोलायला लागला की, “अहो अण्णा!” (कधीतरी ‘अण्णा’ नसून ‘अप्पा’, ‘तात्या’ नाहीतर ‘दादा’, ‘भाऊसाहेब’), आता बावन्न किंवा फार फार तर पंचावन्न वय असेल तुमचं. अजून भरपूर वर्षं आहेत तुमच्याकडे. ते एफडी वगैरेऐवजी दुसरीकडे पैसे गुंतवा!”
“अहो! नाव काय तुमचं?”
“रंजन खेबुडकर. जगदीश खेबुडकर माझे कुणीही लागत नाहीत.”
“असेल! माझं वय पासष्ट आहे.”
अप्पा, अण्णा आपल्याला लोक तब्बल दहा-बारा वर्षांनी तरुण समजतात त्यामुळे सुखावतो. क्वचित कवळी सांभाळून एखादी अस्फुट शीळही त्यांच्या ओठातून निसटते. तर मग काळजी नको का करायला?
“मी सांगतो तसं करा. उद्या एक माणूस पाठवतो. तो तुम्हाला नियमित गुंतवणूक करायची याचा सल्ला देईल. घरच्यांनाही विचारा. साधारण दहा-बारा टक्के परतावा मिळेल. द्या पत्ता! आणि हो, चार-पाच वर्षं थांबा आणि मला सांगा, पैसा कसा वाढतोय तो!”
रंजन फसवत बिलकूल नाही. फक्त सर्वसामान्य लोकांना फारसे माहीत नसलेले सुलभ बचतीचे मार्ग सांगतो. साधारण दोन वर्षांनी अप्पा किंवा अण्णा खुश झालेले असतात. तब्बल पंधरा टक्के परतावा मिळालेला असतो. अति हावेपायी, लोभाने बरबाद झालेल्यांसाठी मात्र तो काहीच करू शकत नाही. प्रेमात पडून निराश होणाऱयांकडे त्याच्याकडे रामबाण उपाय आहे.
“एकदा विचारून टाक तिला.”
“ती नाही म्हणाली तर? आता कसं आहे, ती होय म्हणेल या आशेवर दिवस वाईट आणि चांगला दोन्हीही जातो.”
“पण मग कोणी दुसऱयाने विचारलं आणि तिच्या मनात तू आहेस, पण विचारत नाहीस म्हणून तिने आततायीपणा केला तर?”
“नाही नाही! असं कसं!”
“असंच होतं बरेचदा. आता माझंच उदाहरण घे! सहा महिन्यांत माझं लग्न होणार आहे. एका मुलीवर माझं खूप प्रेम होतं आणि दुसरीही मुलगी मला आवडायची. कितीतरी दिवस कसं काय करायचं या विचारात होतो. शेवटी त्या दुसऱया मुलीला एका रेस्टॉरंटमध्ये बोलावलं आणि पहिलीलाही बोलावलं. दोघी आल्या. मग त्यांना समोर बसवलं आणि जी मला जास्त आवडत होती तिला विचारलं, माझ्याशी दोन-तीन वर्षांनी लग्न करशील? ती म्हणाली, नाही. डोळ्याचं पातं लवायच्या आत दुसरीला विचारलं…”
ऐकणारा अवाक् होऊन म्हणाला,
“काय विचारलंस?”
“काही नाही, ‘आणि तू गं…’, बास, एवढंच! पुन्हा माझ्याशी लग्न करशील का? वगैरे फापटपसारा नाही. ‘तू गं…’ इतकंच! आणि ती चक्क ‘हो’ म्हणाली. मग पहिली होती तिला सांगितलं, आता आम्हाला दोघांना तू पार्टी दे. मस्त पार्टी केली. दोन वर्षं झाली, आता आयुष्यात स्थिर झालो. सहा महिन्यांनी लग्न!”
“मग तिला त्या चष्मेवाल्याबरोबर लग्न करावं लागेल, जर मी नाही विचारलं तर?”
“हो! तुला अभिनयात करीयर करायचं आहे ना? तिला सांग, हा व्यवसाय अस्थिर असतो. कधी संधीचं सोनं होईल हे सांगता येत नाही. मला यश मिळाल्यानंतर तुला सगळं काही देईन, पण तोपर्यंत वाट बघायची तयारी असेल तरच मला होकार दे. तू माझ्या आयुष्यात आलीस तर मला फार आनंद होईल… वगैरे वगैरे. ते तू तुझं ठरव काय बोलायचं ते. मी तुला पाण्यापर्यंत नेईन, प्यायला तुलाच लागेल. चल! लवकरात लवकर काय तो निकाल लाव. हे बघ! तिच्याकडे दोनच उत्तरं आहेत, ‘हो’ किंवा ‘नाही’! म्हणजे पन्नास टक्के संधी आहे तुझ्याकडे. आम्ही तर दोन-तीन टक्के कमिशनवर व्यवसाय करतो.”
पंधरा दिवसांनी रंजनला त्या मुलाने आणि मुलीने जंगी मेजवानी दिली. “मला राग आला होता याचा. विचारतच नव्हता मला.”
दोघे भररस्त्यात त्याच्या पाया पडले. त्याचे मित्र मनातल्या मनात रोजच त्याच्या पाया पडत असतात.



























































