पोलिसांच्या कंत्राटी भरतीने कायदा-सुव्यवस्था बिघडेल! शरद पवार यांचा सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पाच महिन्यांत 19 हजार 553 तरुणी, महिला बेपत्ता झाल्या आहेत. हे रोखण्यासाठी कायदा-सुव्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, पोलीस दलात अनेक पदे रिक्त असून आता प्रथमच या विभागातही कंत्राटी भरतीचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो. त्यामुळे कंत्राटी पद्धतीऐवजी कायमस्वरूपीच भरती करायला हवी. यासाठी शासनाने हयगय करू नये, असे यावेळी शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून मिंधे सरकारला सामील झालेले अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार अशी चर्चा आहे. परंतु त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न हे दिवास्वप्न ठरणार आहे. यामागचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उदाहरणासह सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात मुली व महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण, सरकारकडून दत्तक दिल्या जाणाऱया शाळा, कंत्राटी पोलीस भरती, आमदार अपात्रता सुनावणी यावर त्यांनी भाष्य केले.

‘अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच आहे. ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाही असे तुम्ही म्हणालात त्यामागची कारणे काय आहेत,’ असा प्रश्न माध्यमांनी शरद पवार यांना यावेळी विचारला. त्यावर त्यांनी एक उदाहरण देताना सांगितले की, ‘आर. आर. पाटील आमचे एक सहकारी, ते प्रत्येक सभेत म्हणायचे शरद पवार प्रधानमंत्री झाले पाहिजेत. मी त्यांना एकदा सांगितले, माझ्याकडे 10 खासदार आहेत आणि 10 खासदारांच्या शक्तीवर प्रधानमंत्री व्हायला जायचे हे योग्य आहे का? काही संबंध आहे का? त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचे असेल तर विधानसभेत 145 आमदार लागतील. जर 145 आमदारांची शक्ती सोबत नसेल किंवा इतर पक्षाच्या मदतीने 145 पर्यंत पोहचू शकत नसेल तर ते दिवास्वप्न आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

कंत्राटी भरतीला विरोध

राज्यातील कंत्राटी भरतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असून कायमस्वरूपी भरती केली जावी, अशी भूमिकाही शरद पवार यांनी यावेळी मांडली. कंत्राटी भरतीमध्ये आरक्षण न मिळाल्याने विविध घटकांवर अन्याय होईल, असे ते म्हणाले. अवघ्या अकरा महिन्यांसाठी पोलीसमध्ये भरती झालेल्या मुलाने त्यानंतर काय करायचे, असा सवाल त्यांनी सरकारला केला. त्याचप्रमाणे शिक्षकांचाही कंत्राटी भरतीला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस दलाला सहकार्य म्हणून होमगार्ड यंत्रणा अधिक बळकट करायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला. आरोग्य विभागातही कायमस्वरूपी भरती करावी, असे ते म्हणाले.