गद्दारांना गाडल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही! राहुल चव्हाण-पाटील यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीचे बीज उपजत नाही, हा आजवरचा इतिहास असून, महाराष्ट्रातील जनता गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माढा लोकसभा निरीक्षक राहुल चव्हाण पाटील यांनी व्यक्त केला. ते सांगोला तालुक्यातील आलेगाव येथे ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाच्या समारोप सभेत बोलत होते.

राहुल चव्हाण पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. जनतेला पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही. रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण, हे जनतेला माहिती नाही. गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारने देशातील जनतेचं वाटोळं केलं आहे. या सरकारने गेल्या नऊ वर्षांत फक्त आश्वासनांचा भडिमार केला आहे. जनतेला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेठीस धरले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

या तालुक्यातील आमदाराने फक्त जनतेला विकासचं गाजर दाखविण्याचे काम केलं व जनतेसाठी आलेला निधी टक्केवारी ठरवून स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम सुरू केलं आहे. सांगोला तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळेच हे लबाडांचे सरकार म्हणावे लागेल, असे सांगत केंद्र सरकारच्या बोलघेवडय़ा योजनांचा भंडाफोड चव्हाण यांनी केला.

यावेळी माजी तालुकाप्रमुख गुलाबराव बाबर, हरिभाऊ पाटील, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सरगर, शिवसेना तालुका समन्वयक भारत मोरे, युवा उपजिल्हाधिकारी रघुनाथ गायकवाड, समाधान दिवसे, शंकर मेटकरी, श्रीधर बापू यादव, सौरभ चव्हाण, गणेश घाडगे, गोरख येजगर, समाधान चव्हाण, नामदेव सरगर, सचिन वाघमारे, ओम माने यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, पदाधिकाऱयांसह वाकी, मेडशिंगी, चिंचाळे, मानेगाव, कमलापूर, हातीद, हटकर मंगेवाडी, जुजारपूर, घेरडी, आलेगाव येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.