पुराव्यांची गरजच नाही आता निकाल द्या! विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेचा जोरदार युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार अपात्रता सुनावणीवेळी आज शिवसेनेच्या वकिलांनी आक्रमकपणे युक्तिवाद केला. मिंधे गटाने या प्रकरणी आणखी पुरावे सादर करण्यास मुदत द्यावी अशी मागणी केली. मात्र शिवसेनेने त्याला तीव्र आक्षेप घेतला. आता नव्या पुराव्यांची गरजच नाही, वेळकाढूपणा नको असा जोरदार युक्तिवाद शिवसेनेचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी केला. पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. मिंधे गटाच्या वकिलांनी दीड तास तर शिवसेनेच्या वकिलांनी सुमारे पावणेदोन तास युक्तिवाद केला. आणखी काही ठोस पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी मिंधे गटाच्या वकिलांनी केली. त्यावर आता अचानक पुरावे सादर करण्याची जाग आली असा आक्षेप घेत शिवसेनेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधारही यावेळी दिला. त्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फक्त प्रथमदर्शनी चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा पूर्णपणे पुरावे बघण्याची गरज नाही. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनाही चौकट घालून दिली आहे आणि त्या चौकटीत राहूनच त्यांना निर्णय द्यायचा आहे, असेही अॅड. कामत यांनी सुनावणीवेळी सांगितले. पुराव्यांसाठी पुन्हा मुदत दिल्यास न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरेल याकडेही अॅड. कामत यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या जागी शिवसेनेचा गटनेता म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली. त्यांचा तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला. ही बाब देवदत्त कामत यांनी यावेळी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी, उपाध्यक्षांनी घेतलेला निर्णय मला बांधील नाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही पक्ष कोणाचा हे मला ठरवायला सांगितले आहे, असे सांगितले. त्यावर अॅड. कामत यांनी, 21 जून 2018 पूर्वी जो शिवसेना पक्ष अस्तित्वात होता त्या पक्षाची घटना आणि पदांची संरचना या आधारे निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असल्याची आठवणही अध्यक्षांना करून दिली.

या सुनावणीवेळी शिवसेनेच्या वतीने खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब आणि सुनील प्रभू उपस्थित होते. मिंधे गटाकडून एकही आमदार उपस्थित नव्हता.

वकिलांमध्ये शाब्दिक चकमक
शिवसेना आणि मिंधे गटाच्या वकिलांमध्ये या सुनावणीदरम्यान शाब्दिक चकमक झाली. शिवसेनेचे वकिल देवदत्त कामत हे युक्तिवाद करत असताना मिंधे गटाच्या वकिलांनी खाली बसून त्यावर कमेंट केली. त्याला अॅड. कामत यांनी आक्षेप घेतला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मिंधे गटाच्या वकिलांना ताकिद दिली.

शिवसेनेच्या वकिलांचा युक्तिवाद

– निर्णय घेताना पक्ष कुणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही. z सत्तांतराच्या कालावधीत काय घडले तेच आता विधानसभा अध्यक्षांनी पाहायचे आहे. राजकीय पक्षाची संरचना काय आहे हे आता विचारात घ्यायची गरज नाही. शिंदे गटाची याचिका पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असा निर्णय घेऊ नका की ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होईल. z भ्रष्टाचार झाला होता हे कारण महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ग्राह्य धरता येणार नाही. z उदय सामंत यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. एका याचिकेत त्यांनी एकीकडे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत असे म्हटले आहे आणि दुसरीकडे ते पक्षप्रमुख नाहीत असे नमूद केले आहे. हा काय घोळ आहे? z उदय सामंत यांची सही असलेल्या शिवसेनेच्या याचिकेचा आधार शिंदे गटाकडून घेतला जात आहे. उदय सामंत त्यानंतर शिंदे गटात सहभागी झाले होते. मग ते स्वतःची सही असलेल्या याचिकेवर कसा काय आक्षेप घेऊ शकतात? z 21 जून 2022 रोजी घेतलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याऐवजी गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. शिंदे गटाने लेखी सादर केलेल्या उत्तरामध्ये ही बैठक झाल्याचे म्हटले आहे तर दुसरीकडे तोंडी युक्तिवाद करताना ही बैठक झालीच नाही असा दावा करतोय. शिंदेंची ही भूमिका म्हणजे विनोद आहे.

कोर्टाचे ऐकू की माझा निर्णय देऊ, राहुल नार्वेकर यांचा त्रागा
मी कुणाचे ऐकायचे, सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की स्वतःच्या अधिकारात निर्णय घ्यायचा? असा त्रागा नार्वेकर यांनी केला. त्यावर नियम पुस्तिकेत न्यायाधिकरणाचे अधिकार सांगितले आहेत. तुम्ही निर्णय घेताना फक्त तत्कालीन नेतृत्व संरचना आणि पक्षाची तेव्हाची घटना लक्षात घ्या, असे अॅड. देवदत्त कामत म्हणाले.