‘बेस्ट’ आता फिल्टर धूर सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आता ‘बेस्ट’ बसमधील धुरातील विषारी आणि हानिकारक द्रव्ये फिल्टर करून बाहेर फेकणारे मशीन बसवले जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 350 बसमध्ये ही धूर फिल्टर करणारी मशीन्स बसवली जाणार आहेत. तर आगामी काळात ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणाऱ्या सर्व गाडय़ांमध्ये यंत्रणा बसवली जाणार आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याने पालिकेचे टेन्शन वाढले आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयानेदेखील  पालिकेला अनेक वेळा फटकारले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात  येत असून आयआयटी, मुंबईसारख्या सहा तज्ञ एजन्सी हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत काम करीत आहेत. मुंबईत वाहनांपासून निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी वाहनांमध्ये ‘व्हेईकल माऊंटेड फिल्टर’ बसवण्यात येणार आहेत. याची सुरुवात ‘बेस्ट’ उपक्रमापासून करण्यात येणार असल्याची माहिती आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

50 ठिकाणी एअरप्युरीफायर

मुंबईत सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या जंक्शनच्या ठिकाणी हवा शुद्ध करण्यासाठी ‘एअर प्युरिफायर’ बसवण्यात येणार आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर दहा ठिकाणी ही ‘व्हर्च्युअल चिमणी’ प्रकारातील यंत्रणा बसवण्यात येणार आहे.  धुळीचे कण शोषून शुद्ध हवा सोडणारी यंत्रणाही मुंबईच्या महत्त्वाच्या मैदानांवर बसवली जाणार आहे.

विषारी धूर सोडणाऱ्या बेकऱ्या रडारवर

मुंबईत शहरी भागासह झोपडपट्टय़ांमध्येही ठिकठिकाणी असलेल्या बेकऱ्यांमध्ये जाळण्यात येणारे प्लायवूड धोकादायक ठरत आहे. जळणासाठी लाकूड महाग पडत असल्याने खराब प्लायवूडचा वापर बेकऱ्यांमध्ये केला जातो. मात्र प्लायवूड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांमुळे बेकऱ्यांमधून विषारी द्रव्ये बाहेर पडतात. त्यामुळे बेकऱ्यांमध्ये गॅसचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येणार असून कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शिवाय बेकऱ्यांना चिमण्यांची उंची वाढवण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.