
तब्बल 75 वर्षांपासून आमची जमीन इस्रायलच्या ताब्यात असून 7 ऑक्टोबरसारखे हल्ले पुन्हा करू, असा इशारा हमासने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीद्वारे इस्रायलला दिला आहे. त्यात इस्लामिक देशांनीही पॅलेस्टिनींच्या मदतीसाठी निधी उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
इस्रायलला आपल्या भूमीवर अजिबात स्थान नाही, अशा शब्दांत हमासचे राजकीय गटाचे सदस्य आणि प्रवक्ते गाझी हमद यांनी इस्रायलविरोधातील आपला संताप व्यक्त केला. इस्रायलला धडा शिकवावाच लागेल. अल-अक्सा फ्लड ऑपरेशन ही केवळ सुरुवात आहे. 7 ऑक्टोबरप्रमाणे आम्ही दोन, तीन आणि चारवेळादेखील हल्ले करू. त्यांना पॅलेस्टिनी भूमीतून पुसून टाकू असेही हमद यांनी म्हटले आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जखमी आणि नागरिकांना मदत मिळावी तसेच ओलिसांची सुटका करण्याच्या अनुषंगाने काही काळ युद्धविराम घ्यावा अशी सूचना केली आहे. शुक्रवारी बायडेन इस्रायलला रवाना होणार आहेत.
पॅलेस्टाईनसाठी सौदी अरेबियाचे किंग सलमान यांनी पाच दशलक्ष अमेरिकन डॉलर तर क्राऊन प्रिन्स मोहम्मद बीन सलमान यांनी आठ दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत जाहीर केली आहे.
- लॅटीन अमेरिकन देश बोलाव्हियाने इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडले. तर कोलंबिया आणि चिलीने तेल अविवमधून राजदूतांना परत बोलावले.
- उत्तर गाझा पट्टीतील इंडोनेशियन रुग्णालयाला वीजपुरवठा करणारे मुख्य जनरेटर गुरुवारी सकाळी बंद पडले.
- आतापर्यंत 3 हजार 600 हून अधिक पॅलेस्टिनी मुलांचा युद्धात मृत्यू.
- 361 परदेशी नागरिक आणि 45 जखमी पॅलेस्टिनींनी राफा सीमेतून इजिप्तमध्ये प्रवेश केला.
- वेस्ट बँक येथील पॅलेस्टिनींना इस्रायली सैनिकांनी विवस्त्र करत फरफटत नेले, डोळे आणि हात बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे वृत्त.



























































