रंगपट – नाटक म्हणजे जीवनातला संतोष…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शब्दांकन – राज चिंचणकर

प्रयोगाला ‘नाही’ असे कधीही न म्हणणारा लेखक, दिग्दर्शक व अभिनेता संतोष पवार व्यक्त करत आहे खास मनोगत…

अनेक एकांकिका केल्यानंतर मला दोन अंकी नाटक करायची संधी मिळाली आणि तीसुद्धा राज्य नाटय़ स्पर्धेसाठी. या नाटकाच्या तालमी आम्ही करत होतो आणि त्यादरम्यान माझ्या पप्पांना हृदयविकाराचा झटका आला. काय करावे ते कळतच नव्हते. अर्धे लक्ष पप्पांकडे आणि अर्धे लक्ष तालमींकडे अशी माझी स्थिती झाली होती. पप्पा जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, “तू तालमीला गेला नाहीस का?’’ आता गंमत अशी की, याआधी घरूनच मला सांगण्यात येत होते की नोकरी वगैरे बघ, नाटक म्हणजे अळवावरचे पाणी. आता तेच पप्पा मला तालमीबद्दल विचारत होते, पण त्यांना त्या अवस्थेत सोडून जायची माझी हिंमत होत नव्हती. पण कसेबसे का होईना शेवटी मी ते नाटक केलेच.

मी एक गोष्ट आजपर्यंत कायम पाळली आहे आणि ती म्हणजे, इतक्या वर्षांत मी कुठल्याही प्रयोगाला ‘नाही’ म्हटलेले नाही. मी माझी सर्व कामे सांभाळून नाटकांचे प्रयोग केले आहेत. माझ्या लग्नाच्या आदल्या रात्रीसुद्धा मी नाटकाचा प्रयोग केला आहे. लग्नाच्या दुसऱया दिवशीसुद्धा मी तालमीला गेलो होतो. अगदी लग्न झाल्यानंतर मी फिरायलासुद्धा कुठे गेलो नाही. कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी माझे ‘यदा यदाही अधर्मस्य’ हे नाटक गोव्याला होते. या नाटकाच्या निमित्ताने घडलेली गोव्याची ट्रीप म्हणजेच आमचा हनिमून होता.

कॉण्टॅक्टच्या प्रयोगांमुळे तर आम्हाला ऑडियन्स मिळतो, निर्मात्याला चार पैसे मिळतात. एका कॉण्टॅक्टच्या प्रयोगाच्या वेळी नेमके माझ्या मुलीचे बारसे होते. मी हॉलवर गेलो, सगळ्या मंडळींना भेटलो आणि लगेच प्रयोगाला जायला निघालो. माझ्या बहिणीचे लग्न असताना दुपारी मी माझ्या नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो. अशाप्रसंगी त्या लोकांना भेटल्यावर मी खूप भावनिक व्हायचो.

माझ्या पप्पांना दुसऱयांदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची अँजिओग्राफी करायची होती. त्यादिवशी माझा कॉण्टॅक्टचा प्रयोग होता आणि तोसुद्धा कोकणात. तिथे जाणे भागच होते. पप्पा त्याही अवस्थेत मला म्हणाले, “तू जा प्रयोगाला, आम्ही इथे सर्व काही सांभाळून घेऊ.’’ प्रयोग सुरू झाल्यानंतर मी त्या नाटकाच्या मंडळींना सांगितले, “मला आता एकही पह्न देऊ नका. प्रयोग पूर्ण होऊ दे.’’ अलीकडेच मला ‘स्लिपडिस्क’ झाले तेव्हा माझे प्रयोग ठरलेले होते. मला तर उभे राहणेही शक्य होत नव्हते. “जर आराम केला नाही, तर ऑपरेशन करावे लागेल,’’ असे मला डॉक्टरांनी बजावून सांगितले होते. पण मला प्रयोगही रद्द करायचे नव्हते. मग मी आमच्या नाटकातल्या कलाकारांना माझ्या घरी बोलवायचो आणि मी झोपून त्यांच्या तालमी घ्यायचो.

आज मी अतिशय समाधानी आहे की, माझ्यामुळे आजपर्यंत कुठल्याही नाटकाचा कुठलाही प्रयोग रद्द होऊ दिला नाही. माझ्या घरच्यांची साथ मिळाल्यानेच मी हे सर्व काही करू शकतो. पोलीसवाले, मिलिट्रीवाले असोत किंवा कलाकार असोत, या मंडळींना सुट्टी नसतेच. म्हणूनच प्रत्येक कलाकाराकडे माझा असा आग्रह असतो की, त्यांनी नेहमी प्रयोगाचा विचार करायला हवा. प्रयोग रद्द करायची वेळ आली तर आलेल्या प्रेक्षकांना “आता प्रयोग होणार नाही’’ असे सांगणे अतिशय चुकीचे वाटते. या गोष्टी मी अजूनपर्यंत केलेल्या नाहीत आणि कधी करण्याची वेळ आलेली नाही. यासाठी मी रंगदेवतेचा आणि माझ्या कुटुंबाचा आभारी आहे.