
ज्या अधिकाऱ्यावर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असते, त्याच जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीने चिरडल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. गंभीर म्हणजे अपघातानंतर जखमींची मदत करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्याने तिथून पळ काढल्याची माहिती मिळत आहे. ही भयंकर घटना बिहार येथील मधेपुरा येथे घडली आहे.
विजय प्रकाश मीणा असं यातील मुख्य आरोपीचं नाव असून तो मधेपुरा इथला जिल्हाधिकारी आहे. मीणा आपल्या चालकासह गाडीत बसून मधेपुराच्या दिशेने येत असताना चालकाकडून गाडी अनियंत्रित झाली. गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या मजुरांना तिची धडक बसली. या धडकेमुळे एक मजूर, महिला आणि एका मुलीचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले. घटनेनंतर जखमींची मदत करण्याऐवजी मीणा आणि त्यांचा चालक तिथून पळून गेला.
या अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी मीणा यांच्या गाडीची तोडफोड केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यातील तीन जणांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. हे सर्व मजूर राजस्थान इथले असल्याची माहिती मिळत आहे. गुरिया देवी (27), तिची मुलगी (7) आणि अशोक सिंह अशी या मजुरांची नाव आहेत. हे तिघेही रस्त्याच्या कामासाठी राजस्थानहून बिहार येथे आले होते.
अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही. तसंच, काही माध्यमांनी मीणा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील होऊ शकलेला नाही. दरम्यान, अपघात ज्या वाहनामुळे झाला ते आधीच दुरुस्तीसाठी जाणार होतं. त्या दरम्यानच तो अपघात झाला. तसंच, त्या अपघातावेळी जिल्हाधिकारी गाडीत हजर नव्हते, अशी माहिती जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी कुंदन कुमार सिंह यांनी दिली आहे.


























































