
कसोटी आणि वन डेच्या लढाईत हिंदुस्थानवर मात केल्यानंतर जगज्जेता ऑस्ट्रेलियन संघ आता टी-20 च्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. तीन दिवसांपूर्वीच जगज्जेते झालेल्या ऑस्ट्रेलिया आपला आनंद टी-20 मालिकेत साजरा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे आणि यजमान हिंदुस्थानसमोर त्यांना रोखण्याचे आव्हान असेल.
ऑस्ट्रेलियाने जगज्जेतेपद जिंकल्यानंतर पाच सामन्यांच्या मालिकेसाठी केवळ आपल्या आठ खेळाडूंना विश्रांती दिलीय आणि त्यांचे सात खेळाडू या मालिकेसाठी सज्ज आहेत. त्यांना ही मालिकाही जिंकायचीय, तर दुसरीकडे हिंदुस्थानने इशान किशन आणि सूर्यकुमार यादव वगळता सर्व खेळाडूंना विश्रांती दिलीय. त्यामुळे आपल्या नव्या दमाचे खेळाडू या नव्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे आव्हान कसे परतवून लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
वर्ल्ड कप संपून केवळ तीन दिवसही झाले नाही तोच ही मालिका असल्याने राग व्यक्त केला जात आहे. क्रिकेट हे नोटा छापण्याचे यंत्र असल्यामुळे तिचा अतिरेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात हिंदुस्थानचा संघच सर्वात पुढे आहे. ही मालिका न खेळण्याची अनेक कारणे असली तरी आगामी टी-20 वर्ल्ड कपची तयारी करण्याच्या दृष्टीनेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,
इशानला सिद्ध करण्याची संधी
वर्ल्ड कपमध्ये इशान किशनला फारशी संधी मिळाली नव्हती, मात्र युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या स्पर्धेत इशानला आपली योग्यता सिद्ध करण्याची नामी संधी लाभली आहे. दुसरा यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्माचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे इशानला सलामीवीराच्या भूमिकेसह यष्टिरक्षणाचीही जबाबदारी पार पाडावी लागणार. इशानसह यशस्वी जैसवाल सलामीला उतरणार हेसुद्धा स्पष्ट आहे, पण ऋतुराज गायकवाडसुद्धा संघात असल्यामुळे सलामीवीराच्या जागेसाठी तिरंगी लढत होणेही अपेक्षित आहे.
हिंदुस्थानची गोलंदाजी प्रसिध कृष्णासह आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंगवर अवलंबून असेल. यापैकी अंतिम संघात कोण असेल याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. हिंदुस्थानप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा अंतिम अकरा खेळाडूंचा संघही सांगणे कठीण आहे. मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, ट्रव्हिस हेड यांचे स्थान निश्चित मानले जात असले तरी नव्या खेळाडूंना आजमावण्याची शक्यता अधिक आहे.
n हिंदुस्थानचा संघ ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिष्णोई, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
n ऑस्ट्रेलियन संघ ः मॅथ्यू वेड (कर्णधार), ट्रव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनीस, टीम डेव्हिड, जोश इंगलीस, अॅरॉन हार्डी, जेसन बेहरनडॉर्फ, सीन एबॉट, नॅथन इलिस, केन रिचर्डसन, अॅडम झम्पा, तन्वीर संघा.
एकमेकांविरुद्ध किती खेळणार?
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ एकमेकांशी गेल्या वर्षभर खेळताहेत. वर्षाच्या प्रारंभीच उभय संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळली गेली. हे संपत नाही तोच कसोटी अजिंक्यपदासाठी भिडले. त्यानंतर आताच वर्ल्ड कपमध्ये दोनदा एकमेकांशी भिडले. हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्धच नव्हे तर गेले वर्षभर प्रचंड क्रिकेट खेळताहेत. ते खेळणे पुढेही सुरूच राहणार आहे.


























































