नवीन वर्षात एसटीच्या ताफ्यात 3 हजार 495 बसेस, जिल्हा बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात नवीन वर्षात 3 हजार 495 नव्या बसेस दाखल होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज  सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 303वी संचालक मंडळ बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या अनेक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. एसटी महामंडळाला 20 नोव्हेंबर या एकाच दिवशी 36.73 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल  महामंडळाचे  अभिनंदन करण्यात आले. या बैठकीत  2 हजार 200 साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे 2 हजार 200 तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च 2024 अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या 21 वेगवेगळ्या विभागांसाठी 1 हजार 295 साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठीदेखील बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे तसेच 10 टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बस स्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश  एसटी महामंडळाला दिले. सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठय़ा आणि जिह्याच्या ठिकाणच्या बस स्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत 5 हजार 150 ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.