
यूजीसीने मुंबई विद्यापीठाला वर्ग-1 चा दर्जा देऊन विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान केला आहे. यामुळे विद्यापीठ शैक्षणिकदृष्टय़ा सक्षम झाले असले तरी विद्यार्थ्यांना आवश्यक महत्त्वाच्या भौतिक बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रवेश प्रक्रियेपासून ते पदवी अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी प्रमाणपत्र हाती मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत आहे. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता अथवा उच्च पदाच्या नोकरीकरिता परदेशात जातात, मात्र या विद्यार्थ्यांना अद्याप पदवी प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे.
पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पदवीदान समारंभ लवकर होणे गरजेचे असते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हा सोहळा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात होत असे; परंतु यंदा या कार्यक्रमाचा मागमूसही लागत नाही. विद्यापीठात याबाबत कानोसा घेतला असता फेब्रुवारी 2024 पर्यंत हा सोहळा दृष्टिपथात नाही, असे युवासेना माजी सिनेट सदस्यांनी सांगितले.
अनेक विद्यार्थ्यांकडून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे प्राप्त तक्रारींची दखल घेऊन युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू यांना त्यांच्या अनुपस्थितीत कुलसचिव डॉ. सुनील भिरुड यांना निवेदन देऊन पदवीदान समारंभ लवकर आयोजित करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.
























































