
>> अनघा सावंत
‘नीड विकास संस्था’ गेली 18 वर्षे ठाणे-पालघरसह विविध भागांतील आदिवासी कुटुंबांसाठी मोलाचे कार्य करत आहे.
नीड (NEED) म्हणजे सकस आहार (Nutrition), शिक्षण (Education), रोजगार (Employment) आणि शाश्वत विकास (Sustainable Development) ही महत्त्वाची उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून संस्था आदिवासी समाजाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
सारिका यादव यांनी 2005 मध्ये या संस्थेची स्थापना केली असून याविषयी त्या म्हणाल्या, मी समाजकार्याचे शिक्षण घेत असताना आसनगाव, शहापूर या तालुक्यांतील अतिदुर्गम आदिवासी पाडय़ांवरील लोकांच्या विविध समस्यांबाबत सर्वेक्षण करण्याचे काम आम्हाला देण्यात आले होते. तेथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेताना तसेच त्यांचे जीवनमान जवळून पाहताना ‘माणूस’ म्हणून अत्यावश्यक असणाऱया किमान मूलभूत गरजांपासून कित्येक मैल दूर असलेली ही कुटुंबे पाहून मन विचलित झाले. मी लगतच्याच आदिवासी वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे जीवन, त्यांना पडलेल्या समस्यांचा विळखा यांचा अभ्यास केला. त्यांना असलेली मदतीची निकड लक्षात घेऊन कमलेश शामंथुला, विजय आगवणे या माझ्या समविचारी सहकाऱयांच्या मदतीने ‘नीड विकास संस्थे’ची मुहूर्तमेढ रोवली.
संस्थेने प्रथम आसनगाव तालुक्यातील पोंडियाचा पाडा आणि लोभी पाडा या ठिकाणी सामाजिक कार्यास सुरुवात केली. पाडय़ांवरील कुटुंबांशी, त्यांच्या मुलांशी प्रेमाने, आपुलकीने संवाद साधत त्यांना मैत्रीचा हात दिला. सर्वप्रथम कुपोषण ही महत्त्वाची समस्या ध्यानात घेऊन ‘आरोग्य आणि पोषण प्रकल्प’ हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत दररोज विविध प्रकारचा सकस आहार वाटप करण्यास सुरुवात केली. याचबरोबर वैद्यकीय शिबिरे आयोजित करून पाडय़ांवरील सर्व कुटुंबे, त्यांची मुले यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून आजारानुसार मोफत औषधोपचार करण्यात आले. दरवर्षी संस्था आदिवासी भागात राहणाऱया कुटुंबांसाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे घेते.
संस्था आसनगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 2015 पासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करते. यातूनच अनेक विद्यार्थी तालुका, जिल्हास्तरावर होणाऱया स्पर्धांपर्यंत पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांमधील ज्ञान आणि कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने संस्था आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करते.
संस्थेने लहान मुलांसाठी ‘अंगणवाडी’ उपक्रम राबवून त्यांना शिक्षणाची गोडी लावली. त्यामुळे या मुलांच्या पालकांनाही निर्धास्तपणे पोटापाण्यासाठी बाहेर पडता येऊ लागले. मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी त्या त्या वाडीलगतच्या प्राथमिक शाळेत अशा सर्व मुलांना दाखल केले.
गरजू रुग्णांना रुग्णालये तसेच सामाजिक संस्थांमार्फत वैद्यकीय मदत प्राप्त व्हावी यासाठी संस्था माध्यम म्हणून कार्य करते. पाडय़ांवरील सर्व कुटुंबांना शिधापत्रिका, जन्माचे दाखले, जातीचे दाखले, सरकारी दाखले मिळवून देण्यासाठी संस्था नेहमीच मदत करीत आली आहे. महिला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी पाडय़ांवर दोन महिन्यांचे ‘स्वसंरक्षण शिबीर’ आयोजित करण्यात येते.




























































