हनीचं एकदम आरामात चाललंय! काम मिळेना, चमकदार कामगिरी करता येईना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशिष बनसोडे

ड्रग्जची पाळेमुळे सर्वत्रच झपाटय़ाने पसरत आहेत. ड्रग्जमाफिया नाना प्रकारे लपूनछपून एमडी, गांजा, चरस, कोकेनची तस्करी करतात. या ड्रग्जमाफियांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. पण लपूनछपून होणारी ड्रग्जची तस्करी पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेली गुन्हे शाखेतली ‘हनी’ मात्र निवांत आहे. तिच्या वाटय़ाला कुठले कामच येत नसल्याने तिचे एकदम आरामात चाललंय.

ड्रग्जमाफियांचा छुपा कारभार उधळून लावण्यासाठी ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या श्वान पथकात ‘हनी’ ही जर्मन शेफर्ड जातीची श्वान दाखल झाली. कसेही लपवून ड्रग्ज नेण्याचा प्रयत्न केला तरी ड्रग्ज अचूक शोधून काढण्याचे खडतर प्रशिक्षण घेऊन ‘हनी’ आली होती. पण तेव्हापासून ‘हनी’ला ड्रग्ज शोधून काढण्याची चमकदार कामगिरी करताच आलेली नाही. कारण तिला ड्रग्ज शोधण्यासाठी किंवा सरप्राईज सर्चसाठी कुठे नेलेच जात नाही. कधी तरी नेले तर, अन्यथा ‘हनी’च्या वाटय़ाला केवळ आरामच आहे. त्यामुळे कोणी काम देतं का काम? अशी अवस्था ‘हनी’ची झाली आहे. ‘हनी’लाच काही काम नसल्याने तिचे दोन हॅण्डलरदेखील कामाविनाच आहेत.

‘शायना’लाही काम मिळाले नव्हते
‘हनी’च्या आधी ‘शायना’ नावाची श्वान गुन्हे शाखेकडे होती. पण दीड वर्षाच्या काळात ‘शायना’ला काहीच काम करण्याची संधी मिळाली नव्हती. दुर्दैवाने तिचा अकाली मृत्यू झाला. शायना असतानाच श्वान पथकात ‘हनी’ची एण्ट्री झाली होती, पण ‘शायना’प्रमाणे ‘हनी’लादेखील काम करण्याची संधीच मिळत नसल्याचे पाहायला मिळते.

मागे आर्थर रोड कारागृहात ‘हनी’कडून तपासणी करण्यात आली होती. अचानक ‘हनी’ने भेट दिल्याने कैद्यांची टरकली होती. पण पुन्हा ‘हनी’ची भेट कारागृहांमध्ये झालीच नाही. दरम्यान, ‘हनी’ काम करण्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, पण दुर्देवाने तिच्या वाटय़ाला कामच येत नसल्याने तिचा म्हणावा तसा फायदा करून घेतला जात नसल्याचे सांगण्यात येते.

तयार, पण बोलावणेच नाही
पार्सल, कुरियर, वाहनांमधून अथवा अशा प्रकारे विविध मार्गाने लपूनछपून ड्रग्जची तस्करी सर्रास केली जाते. त्यामुळे पार्सल येतात, कुरियरची कार्यालये, रेल्वे स्थानके, बस स्थानके, परराज्यातून सामान घेऊन येणारी वाहने यांची सरप्राईज तपासणी करणे गरजेचे आहे. एखाद्या कारवाई वेळीदेखील ‘हनी’ला बोलावले जाऊ शकते. अशा प्रकारे तपासणी व ड्रग्ज शोधण्यासाठी ‘हनी’ तयार आहे. पण त्यासाठी ‘हनी’ला अमली पदार्थविरोधी कक्षाकडून बोलावणेच येत नाही. अमली पदार्थविरोधी कक्षाकडून या वर्षी हनीला केवळ 12 कॉल आले होते, पण त्यातही ‘हनी’च्या वाटेला काही काम आले नाही.