विनापरवाना संगीत पार्टी, ‘कॅफे माया’वर पोलिसांचा छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ख्रिसमस तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बेकायदेशीर संगीत पाटर्य़ांवर पोलिसांनी नजर वक्र केली आहे. मोठय़ाने डीजे लावून मद्यधुंद अवस्थेत नृत्य सुरू असलेल्या उजळाईवाडी येथील ‘कॅफे माया’ या हॉटेलवर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकला. यावेळी शंभरहून अधिक महिला आणि पुरुष या पार्टीत असल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांनी रोख रक्कम, मद्य, डीजे साहित्य असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

‘कॅफे माया’चा मालक दयानंद जयवंत साळुंखे (रा. उजळाईवाडी, ता. करवीर), पार्टीचे आयोजन करणारी महिला मयुरा राजकुमार चटानी (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), डीजे ऑपरेटर नागेश लहू खरात (रा. फुलेवाडी), त्याचा मालक दिगंबर रघुनाथ सुतार (रा. फुलेवाडी), कामगार गजेंद्र रामदास शेठ (रा. बेकर गल्ली, कोल्हापूर), गौरव गणेश शेवडे (रा. न्यू शाहूपुरी) यांच्यावर बेकायदेशीर पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ख्रिसमस तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही लोक संगीत पार्टीचे आयोजन करीत असतात. यासाठी कोणतीही परवानगी घेतली जात नाही. या पाटर्य़ांमध्ये काहीवेळा गांजासह अमली पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा पाटर्य़ांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱयांना दिल्या आहेत. रविवारी रात्री उजळाईवाडी परिसरातील कॅफे माया हॉटेलमध्ये मोठय़ाने डीजे लावून मद्यधुंद अवस्थेत लोक नृत्य करीत असल्याची माहिती खबऱयाकडून स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पार्टीत 50 महिला आणि 60 पुरुषांचा समावेश होता. येथून 53 हजार रुपयांचे मद्य, 88 हजार रुपयांची रोख रक्कम, 1 लाख 40 हजार रुपये किमतीचा डीजे सिस्टिम असा 2 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांना फोन करा

सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल, अशाप्रकारे कर्णकर्कश आवाजात डीजे लावून कोणी शांतता भंग करीत असेल, पार्टीचे आयोजन केले असेल तर स्थानिक नागरिकांनी हद्दीतील पोलीस ठाणे अथवा पोलीस अधीक्षक कार्यालयात फोन करून माहिती द्यावी. घटनास्थळावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.