मध्य रेल्वेवर फुकटे प्रवासी उदंड झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून दादर, ठाणे स्थानकानंतर आज कुर्ला स्थानकात धडक तपासणी मोहीम राबवली. त्यामध्ये एका दिवसात तब्बल 1294 विनातिकीट प्रवाशांना पकडत चार लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे फुकटय़ा प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे लोकल गाडय़ांसह रेल्वे स्थानकात मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेकजण विना तिकीट प्रवास करत असल्याने रेल्वेचा महसूल बुडतो. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आज कुर्ला स्थानकात 54 तिकीट तपासणीस आणि 17 आरपीएफ जवानांच्या सहकार्याने दिवसभर धडक मोहीम राबवली. त्यामध्ये 1294 विनातिकीट प्रवाशांना पकडत त्यांच्याकडून 4 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तैनात केलेल्या 54 टीसींनी केलेल्या कारवाईचा विचार करता प्रत्येकाने 25 फुकटय़ा प्रवाशांना पकडले आहे. तर त्यांनी वसूल केलेल्या दंडाचा आकडा 7 हजार 758 एवढा मोठा आहे. दरम्यान, प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.