वऱ्हाडी एकांकिकेने मारली बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकांकिकांच्या विश्वात आगळे स्थान राखून असलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत रंगवेद, मुंबई या संस्थेच्या ‘उचल’ या वऱ्हाडी एकांकिकेने बाजी मारत सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा बहुमान प्राप्त केला आहे. नाटय़सेवा थिएटर्स, नाशिक या संस्थेची ‘अ डील’ आणि एकदम कडक नाटय़संस्था, भाईंदर या ग्रुपची ‘पाटी’ या एकांकिकांनी या स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. स्वप्नवेद युवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेची ‘टोपरं’ ही एकांकिका लक्षवेधी ठरली.

सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक आनंद जाधव (‘अ डील’) व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक डॉ. श्वेता पेंडसे (‘उचल’) यांना जाहीर झाले. सुप्रिया प्रॉडक्शन्स व व्हिजन, मुंबई यांनी आयोजित केलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दादरच्या श्री शिवाजी मंदिरात आयोजित करण्यात आली होती. अंतिम फेरीत एकूण सात एकांकिकांमध्ये चुरस होती. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, अमरावती, धाराशीव,  इस्लामपूर येथील नाटय़संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 11 बोलीभाषांमधील 19 एकांकिका सादर झाल्या होत्या.