
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी जिथे जातील तिथे त्यांच्याच नावाची चर्चा असते. मात्र शुक्रवारी वेगळंच घडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी चांगलीच चर्चा झाली ती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी सोलापूरच्या नगर कुंभारी येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान माकप नेते व माजी आमदार आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. यावेळी उपस्थित साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या. झालेला गोंधळ लक्षात येताच त्यांनी त्यात दुरुस्ती केली.
नरेंद्र मोदी स्टेजवर असताना आडम मास्तर बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. मात्र, आडम मास्तरांनी पंतप्रधानांसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेताना उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. आडम मास्तरांना झालेली गडबड लक्षात येताच त्यांनी लगेच सुधारणा केली. असं असलं तरी या निमित्तानं मोदींच्या उपस्थित त्यांच्याच सभेत उद्धव ठाकरे यांची जोरदार चर्चा पाहायला मिळाली.


























































