
प्रायोगिक नाटकाच्या निमित्ताने घडलेला एक प्रसंग कथन करत आहेत ज्येष्ठ रंगकर्मी अजित केळकर…
नाटय़क्षेत्रात विशेषतः प्रायोगिक नाटकांमध्ये मी खूप काम करत असतानाच सन 2008 मध्ये ‘आर. के. लक्ष्मणस कॉमन मॅन’ हा एकपात्री प्रयोग करण्याची संधी मला मिळाली. या प्रयोगातून ‘कॉमन मॅन’ पहिल्यांदाच रंगभूमीवर आला आणि तो थेट लोकांशी बोलला. या प्रयोगाचे लोकांनी खूप काwतुक केले. आर. के. लक्ष्मण 50 वर्षे ‘कॉमन मॅन’चे व्यंगचित्र वृत्तपत्रात दररोज काढत आले होते आणि लोकांना त्याची खूप व्रेझ होती. असा ‘कॉमन मॅन’ मला करायला मिळाल्यावर मी खूश झालो होतो. त्यासाठी मी खूप कष्टही घेतले. ‘कॉमन मॅन’ची वेगवेगळी चित्रे मिळवून, त्याचे संकलन करून, त्याला व्हॉइस ओव्हर देऊन मी तो कार्यक्रम सादर केला. याचे मी दीडशे प्रयोग केले. हिंदुस्थानातल्या अनेक शहरांमध्ये माझे प्रयोग झाले आणि अमेरिकेतही मी 13 प्रयोग केले. यात तो ‘कॉमन मॅन’ स्वतःबद्दल व आपल्या निर्मात्याबद्दल, म्हणजे आर. के. लक्ष्मण यांच्याबद्दल बोलत असे आणि जाता जाता तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असे.
डॉ. जयंत नारळीकर यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘आयुका’ या संस्थेत एकदा एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने त्यांनी माझा हा कार्यक्रम तिथे ठेवला होता. माझा प्रयोग नेहमीप्रमाणेच रंगला. डॉ. नारळीकरांच्या हस्ते माझा सत्कार केला गेला. हे सर्व झाल्यावर मी मेकअप उतरवायला मागच्या खोलीत गेलो. तेव्हा एक जण धावत आला आणि त्याने मला सांगितले, ‘‘डॉ. श्रीराम लागू प्रयोगाला आले आहेत आणि ते तुम्हाला भेटायला येत आहेत.’’ त्याआधी कधी माझी त्यांच्याशी भेट झाली नव्हती. आपण ज्यांना आदर्श मानतो ते डॉ. लागू आपले नाटक बघायला आले आणि ते मला भेटायला येत होते, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.
डॉ. लागू मेकअप रूममध्ये आले तेव्हा मी त्यांच्या पाया पडायला गेलो. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘मला नमस्कार वगैरे काही करू नका.’’ मला माहीत होते की, अनेक मोठय़ा लोकांना असा नमस्कार केलेला आवडत नाही. डॉ. लागूंनी अगदी तोंड भरून नाटकाची व माझी स्तुती केली. ते म्हणाले, ‘‘व्हॉट अ परफॉर्मर यू आर. इतकी वर्षे होतात कुठे? मी वाट बघत होतो की, कुठेतरी तुम्ही चुकाल, काहीतरी गडबड होईल. परंतु तुम्ही मला तशी संधीच दिली नाहीत. फार उत्तम केला तुम्ही प्रयोग.’’ त्यांची प्रतिक्रिया ऐकून मला खूप समाधान वाटले.
तेवढय़ात मला त्यांनी विचारले, ‘‘आर. के. लक्ष्मणसुद्धा आले आहेत ना कार्यक्रमाला?’’ मी ‘‘हो’’ म्हटल्यावर डॉक्टर मला म्हणाले, ‘‘कृपया माझी त्यांच्याशी ओळख करून द्याल का?’’ आता जगातल्या दोन थोर व्यक्तींची ओळख करून देण्याचा प्रसंग माझ्या आयुष्यात असेल, तर याहून अधिक महान गोष्ट कोणती असे मनात म्हणत मी डॉक्टरांना आर. के. लक्ष्मण यांच्या खोलीत घेऊन गेलो. ते व्हीलचेअरवर होते. मी त्यांना डॉ. लागूंची ओळख करून देताना म्हटले, ‘‘ही इज अ डॉन ऑफ मराठी थिएटर. नटश्रेष्ठ, नटसम्राट आहेत ते.’’ माझे बोलणे सुरू असतानाच गंमत अशी झाली की डॉ. लागूच आर. के. लक्ष्मण यांच्या पाया पडायला गेले. आर. के. लक्ष्मण यांना तर अजिबातच पाया पडलेले आवडत नसे. माझी जेव्हा त्यांच्याशी पहिली भेट झाली होती तेव्हा मी त्यांना नमस्कार करायला गेलो होतो. तेव्हा आर. के. लक्ष्मण यांनी मला सांगितले होते की, ‘‘अजिबात कोणाच्याही पायाला हात लावायचा नाही.’’ डॉ. लागू आर. के. लक्ष्मण यांच्या पाया पडायला गेल्यानंतर त्यांनी व्हीलचेअर वरूनच पाय असे बाजूला केले की, मला मनातल्या मनात हसू आले.
या प्रयोगाच्या निमित्ताने मला डॉ. श्रीराम लागू यांची शाबासकी मिळाली हे माझे खूप मोठे भाग्य आहे. ‘नटसम्राट’ नाटकाच्या प्रारंभी एक वाक्य आहे की, ‘‘लोकमान्यांचे आशीर्वाद मिळाले, गणपतरावांची शाबासकी मिळाली, एका नटाला आणखी काय हवे असते?’’ तसे खरे तर मी पण म्हणू शकतो की, ‘‘डॉक्टरांची इतकी मोठी शाबासकी मिळाली, तर अजून काय हवे?’’ त्यादिवशी मला खूप कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
शब्दांकन – राज चिंचणकर
























































