
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या ‘न भूतो न भविष्यति’ आयोजनासाठी नगर हौशी कबड्डी संघटनेने घेतलेल्या मेहनतीमुळे वाडिया पार्कवर आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसा कबड्डीचा रांगडा आणि मर्दानी खेळ पुढील चार दिवस कबड्डीप्रेमींना पाहायला मिळणार आहे. हिंदुस्थानी संघाची निवड चाचणी असलेल्या या 70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी हिंदुस्थानातील 30 संघ मॅटवर आपले काwशल्य पणाला लावतीलच, पण सुपर फॉर्मात असलेल्या यजमान महाराष्ट्राच्या तगडय़ा आणि जबरदस्त संघाला आपले गतवर्षी हुकलेले जेतेपद यंदा मिळवण्याची संधी आहे. तसेच गतविजेते हिंदुस्थानी रेल्वेसह सेनादल, हरयाणा, हिमाचल प्रदेश हे संघही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हिंदुस्थानी कबड्डीचे खरेखुरे हिरे नगर जिह्याच्या वाडिया पार्कमध्ये गुरुवारपासून धुमाकूळ घालणार आहे. प्रो कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळय़ा संघात खेळणारे स्टार आपापल्या राज्य संघांसाठी पुन्हा एकदा एकत्र होऊन प्रतिस्पर्ध्यांशी भिडताना दिसतील. चार दिवस चालणाऱया कबड्डीच्या राष्ट्रीय थरारासाठी हिंदुस्थानातील अर्जुनवीर, कबड्डीवीर नगरकरांना याचि देही पाहायला मिळणार आहेत. गेली तीन महिने नगर कबड्डी संघटना या स्पर्धेची तयारी करत असल्यामुळे नगरकरांमध्ये या स्पर्धेविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. आयोजकांनीही तब्बल 15 हजार कबड्डीप्रेमींना कबड्डीचा थरार पाहता यावा म्हणून जबरदस्त गॅलरी उभारली आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने नववधूप्रमाणे सजलेल्या वाडिया पार्कमध्ये कबड्डीप्रेमींचा जनसागर पाहायला मिळेल, असा विश्वास आयोजक शशिकांत गाडे यांनी व्यक्त केला आहे. नगरला राष्ट्रीय कबड्डीच्या आयोजनासाठी प्रथमच संधी मिळाली आहे आणि या संधीचे सोने करण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न आम्ही केले असून एक सुपर कबड्डी यानिमित्ताने नक्कीच पाहायला मिळेल, असेही गाडे म्हणाले. आमच्यासाठी देशभरातून येणाऱया कबड्डीपटूंप्रमाणे कबड्डी पाहायला येणारे कबड्डीप्रेमीही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनाही आम्ही प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
आसाम, अरुणाचल प्रदेश नाहीच
राष्ट्रीय स्पर्धेसाठी 32 संघ येणे अपेक्षित होते. त्यापैकी 30 संघांनी आपली निश्चिती आधीच कळवली होती आणि आसाम आणि अरुणाचल प्रदेश या संघांनी काहीच कळवले नसल्यामुळे ते येणारच नव्हते. तसेच या स्पर्धेत ईशान्य हिंदुस्थानातील मणिपूर, त्रिपुरा या संघांनी सहभाग घेतला असला तरी नागालॅण्ड, मिझोरम या संघांपर्यंत अद्याप कबड्डी पोहोचलेली नसल्यामुळे तेसुद्धा नाहीत.
रेल्वे–बीएसएनएलमध्ये उद्घाटनीय सामना
गतविजेती हिंदुस्थानी रेल्वे आणि बीएसएनएल या संघांमध्ये उद्घाटनीय सामना खेळला जाणार आहे. महाराष्ट्राप्रमाणे रेल्वेलाही सोप्पा ड्रॉ लाभला आहे. त्यामुळे रेल्वेसुद्धा बाद फेरीत नक्कीच दिसेल. मात्र ‘ड’ गट हा अत्यंत अटीतटीचा झाला आहे. यात हरयाणाला हिमाचल प्रदेशसारख्या संघांशी साखळीतच झुंजावे लागणार आहे. तसेच या गटात त्रिपुरा आणि उत्तराखंड हेसुद्धा संघ आहेत.
महाराष्ट्र जेतेपदाचा संभाव्य दावेदार
नेहमीच राज्य संघात स्थान मिळवण्यासाठी राज्य संघटनेकडे वशिलेबाजी चालेत आणि वशिल्याचे तट्टूच संघात निवडले जायचे. मात्र यंदा राज्य संघटनेने प्रामाणिकपणे दमदार आणि इमानदार खेळाडूंची निवड केल्यामुळे राज्याचा तगडा संघ स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व पुणेरी पलटनला प्रो कबड्डीचे जेतेपद जिंकून देणाऱया अस्लम इनामदारकडे सोपविण्यात आल्यामुळे संघाची ताकद आपसूकच वाढली आहे. सध्या संघात अस्लमसह प्रणय राणे, सौरभ राऊत, शंकर गदई, मयूर कदम, हर्ष लाड, आदित्य शिंदे, संकेत सावंत, किरण मगर, ओमकार पुंभारसारखे जबरदस्त खेळाडू आहेत. या संघांला जेतेपदासमीप नेण्याची जबाबदारी शांताराम जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यातच ‘ब’ गटात दिल्ली आणि गुजरात हे दुबळे संघ लाभल्यामुळे महाराष्ट्राचे बाद फेरीत पोहोचणे आधीच निश्चित झाले आहे. महाराष्ट्राचा सलामीचा सामना पहिल्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता गुजरातविरुद्ध रंगणार असून या सामन्यात मोठय़ा विजयासह सलामीची अपेक्षा आहे.
70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची गटवारी
अ गट ः हिंदुस्थानी रेल्वे, मध्य प्रदेश, बीएसएनएल
ब गट ः महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात
क गट ः गोवा, बिहार, मणिपूर, बंगाल
ड गट ः हरयाणा, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड
इ गट ः तामीळनाडू, राजस्थान, झारखंड, पुदुच्चेरी
एफ गट ः चंदिगड, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा
जी गट ः उत्तर प्रदेश, केरळ, जम्मू-कश्मीर, विदर्भ
एच गट ः सेनादल, पंजाब, आंध्र, ओडिशा




























































