काही वर्षांपूर्वी मोदींनी देशात नोटाबंदी केली होती. पण, आज महाराष्ट्रात मोदींची नाणेबंदी आहे. इथे फक्त ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप आणि मिंधेंवर गरजले. महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी आलेल्या उद्धव ठाकरेंची तोफ बोईसरच्या आंबटगोड मैदानावर धडाडली.
या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी पालघरविषयीच्या जुन्या आठवणी जागवल्या. तसंच, वाढवण बंदराविषयी शिवसेनाप्रमुखांच्या निर्णयाचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी पालघरमध्ये आलोय. 1995मध्ये आपलं युतीचं सरकार असताना जो विषय शिवसेनाप्रमुखांनी संपवून टाकला होता, तो जिवंत कुणी केला? वाढवण बंदराचा तो विषय तुम्हाला माहीत आहेच. त्या काळात वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली, जनतेचा विरोध होता. मला शिवसेनाप्रमुखांनी इथल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी जायला सांगितलं होतं. त्यांच्या आदेशाप्रमाणे मी इथे आलो होतो. माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं, माताभगिनी, वृद्ध हे जीव गेला तरी चालेल पण वाढवण बंदर नको म्हणत होते. करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि मग ते बंदर करा इतक्या तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. मी त्या तीव्र भावना शिवसेनाप्रमुखांना सांगितल्या. शिवसेनाप्रमुखांनी तत्काळ तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना फोन लावला होता आणि हे बंदर रद्द करा म्हणाले होते. मग आता तेव्हा घेतलेल्या निर्णयाला परत कुणी हवा भरली. जनतेच्या विश्वासाला किंमत न देता तुम्ही प्रकल्प राबवणार असाल, तर राबवूनच बघा. तुम्ही काय प्रकल्प राबवणार, जनतेचा बुलडोझर आम्ही तुमच्यावरून फिरवणार आहोत, अशी घणघाती टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
‘जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता तेव्हा तुमच्याकडे सगळी मस्ती असते. यांच्या डोक्यात अहंकार गेलेला आहे. मी आजच पेपर वाचलं की सरसंघचालक म्हणाले की रावण विद्वान होता. होय.. रावण विद्वान होता, पण अहंकारामुळे त्याचा घात झाला. हे तर विद्वानही नाहीत, त्यांना नुसताच अहंकार आहे. उपयोग काय? प्रभू श्रीरामांनी वध केलेला रावण हा विद्वान होता, असं सरसंघचालक म्हणताहेत. पण जे तुम्ही बसवलेत ते विद्वानही नाहीत. वाढवण बंदर नक्की कुणासाठी करताय, त्याने काय आणि कुणाचा विकास होणार आहे? इथे समोर बसलेल्यांपैकी कुणाला रोजगार मिळणार आहे? इथे जमलेल्यांनी मला जनसुनावणी असल्याचं समजा आणि सांगा कुणाला बंदर हवंय. (प्रेक्षकांतून नाही असा आवाज) ही आहे जनसुनावणी. इथल्या जनतेला मी सांगू इच्छितो की तुम्हाला इथे भारतीताई ही कट्टर कार्यकर्ती दिलेली आहे. ती तुमच्या आशीर्वादाने नक्की लोकसभेत जाणार आणि पहिल्याप्रथम वाढवण बंदराचा फडशा पाडणार हे तुम्हाला वचन आहे. ‘
‘मोदी जे परिवार म्हणताहेत, तो फक्त यांचे सुटाबुटातले मित्र आहेत. समजा धरून चाला की वाढवण बंदर झालं, तरी कुणाच्या घशात जाईल? कुणाचा मित्र आहे? मग विकास कुणाचा होणार, मग जनतेचं काय होणार? निवडणुकीच्या तोंडावर जर हे फौजफाटा वापरून ते जनसुनावणी घेताहेत. शक्य झालं तर रणगाडे आणून ते वाढवण बंदर पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतील. म्हणून आताच यांना गाडायची वेळ आलेली आहे. आता हे नम्रपणे पाया पडतील. पण आता जर तुम्ही यांना भुललात. तर मागे एक घोषणा होती, एक ही भूल.. (कमल का फूल) ती किती महागात पडली बघा, असा सणसणीत टोला त्यांनी यावेळी लगावला.
गद्दारांवरही त्यांनी यावेळ आसूड ओढले. ‘निवडणुकांचं वारं वाहतंय. गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरताहेत. कोण गद्दार आणि कोण मालक हेही तुम्हाला माहितीये. कारण, मी आधीच पत्रकार परिषदेत बोललोय की मी यापुढे जे बोलेन ते देशाच्या पंतप्रधानांना नसून नरेंद्र मोदींना असेल. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी अपमान करणार नाही, करू शकत नाही आणि करू इच्छितही नाही. पण निवडणुकीत संबंध नसताना ते महाराष्ट्रात येऊन जी शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी भूमिपुत्रांसाठी निर्माण केली. तिला तुम्ही नकली म्हणता. ती काय तुमची डिग्री आहे ? मग खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते आले आणि तेही शिवसेना नकली आहे बोलले. तुम्ही बोला कारण तुमचा पक्ष हा भाडखाऊ जनता पक्ष आहे. भेकड आहे. मी तुमच्या पक्षाला भेकड अशासाठी म्हणतोय की, ज्या पद्धतीने आपले गद्दार फोडले, ईडी-सीबीआय-आयटीच्या बंदुका डोक्यावर लावून इथूनच पालघरमधून ते सुरतेला गेले. म्हणूनच मी इथे आलोय.’
‘आज तुम्ही माझा पक्ष, माझं चिन्ह आणि माझे वडीलही पळवायचा प्रयत्न केला तरी हजारो लोक माझ्यासोबत आहेत. तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात. जो यांची देईल साथ, त्यांचा ते करतील घात हे यांचं ध्येयवाक्य आहेत. 2019मध्ये आम्ही पालघरमध्ये मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून प्रचार केला होता. ती आमची चूक होती. कारण, जी शिवसेना कठीण काळात त्यांच्यासोबत होती. त्या शिवसेनेला जे संपवायला निघतात ते पालघरकरांना काय न्याय देतील? आम्हाला नकली शिवसेना म्हणणाऱ्या अमित शहांच्या गाडीत किती अस्सल भाजपवाले आहेत? सगळ्या स्टेपन्या त्यांच्या गाडीत बसलेल्या आहेत. म्हणून मी यांना भाडखाऊ म्हणतो. मी काय म्हणतो की, इथेच आपण अशी एक निवडणूक घेऊ की ज्यात मी अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काय काम केलं ते सांगतो. मोदीजी तुम्ही दहा वर्षांत काय केलं सांगा… विश्वगुरू मोदींचं प्रत्येक भाषण उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. जिथे चीन जो देशात घुसखोरी करतोय, तिथे हे शेपट्या घालतात. चीन देशात घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे, असं यांचं वागणं आहे. माझं आव्हान आहे की उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा. आम्ही देशाच्या शत्रूंना संपवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं होतं. पण देशाचे शत्रू मोकाट आहेत. त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची हवा टाईट होते. घाबरता. इथे फणा काढता आणि तिथे शेपट्या घालता.’ असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
‘एक प्रश्न आज मी विचारतो की तुम्हाला मोदी सरकार हवं की भारत सरकार. कारण जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो, त्याने देशाचं नाव बदललं तर काय करू शकणार तुम्ही? हा देश माझी भारतमाता आहे. मोदीजी तुम्ही तुमचं नाव तुमच्या घराच्या पाटीवर लावा, माझ्या देशासोबत तुम्हाला ते लावता येणार नाही. तुम्ही पंतप्रधान पदावरून उतरलात की गुहेत गेलात की तिथे तुमचं नाव लावा. पण देशाच्या नावासमोर लागता कामा नये.’
‘अमोल किर्तीकर हा तरुण आज निवडून येतोय. पण, त्याचं नाव जाहीर झालं आणि ईडीवाले मागे लागले. कोरोना काळात खिचडी घोटाळा केल्याचा आरोप करणारे स्वतः निवडणूक रोख्यांचे आठ हजार कोटी खाऊन बसले आहेत. त्याच काळात पीएम केअर फंड होता, त्यात लाखो कोटी रुपये जमा झालेत. पण कुणीही त्यावर बोलत नाही. खिचडी घोटाळ्याचा आरोप ज्याच्यावर झालाय, त्या कंपनीचा मालक मिंधे गटात गेलाय. तो मोकाट आहे. पण त्याच्याकडे काम करणाऱ्यावर आरोप आहे. पण पीएम केअर फंडावर बोलायचं नाही, प्रश्न विचारायचा नाही. कारण तो खासगी फंड आहे. मग पीएमचा अर्थ काय? जर हा फंड प्राईम मिनिस्टर फंड असेल तर तो खासगी कसा ? आणि मोदी पायउतार झाल्यानंतर तो कुणाकडे जाणार आहे, याचं उत्तर मिळायलाच हवं. पण, भाजपमध्ये ज्याचा घोटाळा मोठा, त्याला मोठा मान मिळतो. तुमच्या तोंडाला शेण लागलंय आणि तुम्ही आमचं तोंड हुंगायला येताय.’
पंतप्रधानांना नोटाबंदीची आठवण करून देत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीचंच नाणं खणखणीत असल्याचं ठणकावून सांगितलं. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी हे टीव्हीवर अचानक आले आणि त्यांनी नोटाबंदी जाहीर केली होती. तशी महाराष्ट्रात आता नाणेबंदी लागू झाली आहे. इथे मोदींचं नाणं वाजणार नाही. इथे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार. म्हणून ही पक्षांची फोडाफोड सुरू आहे. पण, राज्याच्या कानाकोपऱ्यात गद्दारांविरोधात चीड निर्माण झाली आहे. कारण, मिंधे जे माईकवर कुंथतात ते बाळासाहेबांचे विचार नाहीत. शिवसेनेचा दरारा काय होता? बाळासाहेबांचा एक फोन गेला तर दिल्लीकर चळाचळा कापायचे. आता दिल्लीतून फोन आला तर मिंधेंची दाढी चळाचळा कापते. हे शिवसेनेचे विचार? तुमच्या बुडाखालची सतरंजी कधी त्यांनी (भाजपने) काढून घेतली तेही तुम्हाला कळलं नाही. अजून पालघरचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मिंधेंना स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. मी 21 उमेदवार जाहीर केले आणि ते कामाला देखील लागले. इथले खासदार मिंधेंसोबत आले आणि मिंधेंसोबत गेले. जर पुन्हा आले की, त्यांना वाढवण बंदराविषयी लोकसभेत तोंड उघडलं होतं का, हा प्रश्न नक्की विचारा. इथे मी तुम्हाला शब्द देतो की, महाविकास आघाडीचं सरकार निवडून आलं तर मी वाढवण बंदराचा विषय यांच्या कागदावरून पुसल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.