लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर सुद्धा प्रचाराने वेग पकडला आहे. सोशल मीडियावर उमेदवारांनी मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामधील एक व्हिडिओ नगर तालुक्यातील साकळाई योजनेसंदर्भात असून त्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या व्हिडिओमध्ये साकळाई योजना पूर्ण करण्यासाठी दिवंगत खासदार बाळासाहेब विखे ते त्यांचा नातू विद्यमान भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी कशाप्रकारे आश्वासन दिले हे दिसत आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. सध्या या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय. मात्र विखे यांनी दिलेल्या आश्वासनासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने विखे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये सुजय विखे एका सभेत बोलताना दिसत असून ते म्हणत आहेत की,’ मला जर तुम्ही मतदान टाकलं तर अहोरात्र काम करून तुम्हाला दिलेला एकएक शब्द पाळेल. पाच वर्षांमध्ये जर मी नगर तालुक्यात पाणी आणलं नाही, तर पुढच्या वर्षी मी उमेदवारीचा अर्ज ही भरणार नाही.’ प्रत्यक्षात मात्र साकळाई योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून नगर तालुक्यात विखे यांनी दिलेले आश्वासनाप्रमाणे पाणी आले नाही. मात्र, त्यानंतरही त्यांनी अर्ज भरल्यामुळे या व्हिडिओची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतेय.