मुलीला भेटण्याच्या ओढीने 85 वर्षांच्या आजी घराबाहेर पडल्या. त्या भोईवाडा येथे आल्या आणि मुलीच्या घरचा पत्ताच विसरल्या. त्याच ठिकाणी अचानक चक्कर येऊन त्या रस्त्यावरच पडल्या.
भोईवाडा नाका येथे एक वृद्ध महिला रस्त्यात पडल्या असल्याचा कॉल भोईवाडा पोलिसांना आला. याची तत्काळ दखल घेत सहाय्यक फौजदार पाटील तसेच अंमलदार पाटील, कांबळे यांनी लगेच भोईवाडा नाका येथे धाव घेतली. त्या वेळी त्या वृद्धा रस्त्यावर पडलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना उचलून गाडीत घेतले. त्या सुस्थितील आल्यानंतर विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे शारदा मोरे (85) असे नाव सांगितले. त्यांच्याकडे राहत्या ठिकाणाबाबत विचारणा केली असता लालबाग येथील गणेश टॉकीजजवळ राहत असल्याचे म्हणाल्या. त्यानुसार पोलिसांनी शारदा मोरे यांना त्यांच्या लालबाग येथील संकल्प इमारतीमधील घरी नेऊन त्यांच्या मुलाच्या स्वाधीन त्यांना केले. भोईवाडा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीबाबत शारदा मोरे यांचा मुलगा प्रशांत (61) आणि सून प्रतिभा (46) यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.