
घाटकोपर छेडानगर परिसरात झालेल्या हार्ंडग दुर्घटनेचे बचावकार्य 50 तासांनंतरही सुरूच असून आतापर्यंत 74 जखमींची सुटका करण्यात आली आहे. आणखी दोन मृतदेह आढळले असून दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 झाली असल्याचे एनडीआरएफने सांगितले. मुंबई महापालिकेने मात्र मृतांचा आकडा 14 असल्याची माहिती दिली.
पालिकेच्या अग्निशमन दलासह एनडीआरएफ, पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसेच बाह्य यंत्रणांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. हार्ंडग कोसळले कसे, याचा तपास करण्यासाठी व्हीजेटीआयची नेमणूक करण्यात आली आहे.
कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले आहेत. या सुटय़ा भागांसह राडारोडा हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर यंत्रणा समन्वय राखून अव्याहतपणे कार्यरत आहेत. इंधन, गॅससारख्या ज्वलनशील पदार्थांच्या साठय़ामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे.
मृतांचा आकडा 16 वर
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. आज आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे एनडीआरएफने सांगितले. लोखंडी सांगाडय़ाखाली आणखी काहीजण दबले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने मात्र मृतांचा आकडा 14 झाल्याचे म्हटले आहे.


























































