
नेवासा तालुक्यातील उस्थळदुमाला शिवारात नगर-छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर मोठा अपघात झाला. या गंभीर अपघातात टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील कृष्णा संभाजी भणगे (वय 27) हे पत्नी सोनालीसह बऱ्हाणपूर येथे बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरुन गेले होते. सायंकाळच्या सुमारास बहिणीला भेटून झाल्यावर पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले असताना उस्थळ पाठ्याजवळ टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भयंकर धडकेत कृष्णा संभाजी भणगे यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सोनाली या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मालवाहू वाहनाचा चालक पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा भणगे हे नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे प्राध्यापक होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, चुलते, भाऊ, भावजाई असे एकूण 15 ते 20 जणांचे एकत्रित शेतकरी कुटुंब आहे. मयत कृष्णा भणगे यांचे चुलत भाऊ किशोर श्रीपती भणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नेवासा पोलीस करत आहेत.