
सलग चार दिवस पावसाने विश्रांती घेतली; धरणातून विसर्गही कमी झाला. त्यामुळे एकीकडे संथ गतीने नद्यांचे पाणी ओसरत असतानाच आता पुन्हा एकदा धरण पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे पहाटे उघडले. शहरातही मध्यरात्रीपासून पावसाने धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेही नद्यांचे पाणी आज सातव्या दिवशीही धोकापातळीच्या वरच राहिले आहे. त्यात उद्यापासून आणखी दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आल्याने कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा धाकधूक लागली आहे.
पाटगाव धरणातून वेदगंगा नदीत विसर्ग
गारगोटी, दि. 31 (सा. वा.) – भुदरगड तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे वेदगंगा नदीवरील पाटगाव धरण आज पहाटे पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून वेदगंगा नदीत विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवर पाटगाव धरण (श्री मौनीसागर जलाशय) बांधण्यात आला आहे. पाटगाव धरणक्षेत्रात कोल्हापूर जिह्यातील सर्वाधिक अतिवृष्टी होत असते. या वर्षीही पर्जन्यमान चांगले झाल्याने जुलै महिन्यात धरण भरले आहे.
दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; 78 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिह्याला 1 व 2 ऑगस्ट रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. सध्या सर्वत्र संततधार, तर कधी अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अजूनही 78 बंधारे पाण्याखाली गेले असून, नऊ राज्यमार्ग व 44 प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत.
कोल्हापूर जिह्यात गेले चार दिवस पावसाने काहीशी उसंत घेतली होती. राधानगरी धरणाचे दोनच स्वयंचलित दरवाजे उघडले होते. तर, शहर आणि करवीर तालुक्यांतील पूरग्रस्त भागातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुन्हा आपल्या घरी परतत आहेत. पण मंगळवारपासून पावसाने जिह्यात पुन्हा जोर धरला आहे. राधानगरी धरण पाणलोटक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, पहाटे 6 वाजता 172 मि.मी. एवढय़ा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे राधानगरी धरणाचे बंद झालेले स्वयंचलित सात दरवाजे आता पुन्हा उघडले आहेत.
राधानगरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे धरण 100 टक्के भरल्याने आज पहाटे 4.50 ते 5.50 या कालावधीत राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यातून भोगावती नदीत 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली. त्यामुळे राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणीपातळी सायंकाळी उशिरापर्यंत 43 फूट धोकापातळीजवळ स्थिर राहिली होती.
गेल्या आठवडय़ात गुरुवारी सकाळी पंचगंगेने 43 फुटांची धोकापातळी ओलांडली होती. त्यानंतर ती 47 फूट 11 इंचांपर्यंत गेली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तब्बल सातव्या दिवशी पाच फुटांची घट होऊन सायंकाळी पाचच्या सुमारास पंचगंगेची पाणीपातळी धोकापातळीजवळ आली. राधानगरी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडल्यानंतर इतरही धरणे भरल्याने त्यातून होणारा विसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा सर्वांना महापुराची धाकधूक लागली होती. दुपारी 1.10च्या सुमारास राधानगरी धरणाचे 2 क्रमांकाचा, तर सायंकाळी 4.40च्या सुमारास 3 क्रमांकाचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे उर्वरित 4, 5, 6 आणि 7 असे चार दरवाजे उघडले असून, त्यामधून सात हजार 212 क्युसेक विसर्ग सुरू होता.