
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी चौका-चौकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच केलेले डांबरी रस्त्यांचे रूपांतर खड्डय़ात झाल्याने महाबळेश्वरात येणाऱया पयर्टकांचे स्वागत खड्डय़ांनी होत आहे. पालिकेच्या या गलथान कारभाराबाबत पर्यटक व नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
उन्हाळी हंगामापूर्वी शहरातील सवर्च रस्त्यांचे पालिकेच्या वतीने डांबरीकरण करण्यात आले होते. पालिकेने शहरातील सर्व रस्ते चकाचक केल्याने पालिकेच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. मात्र, हे कौतुकाचे बोल पावसाच्या पाण्याबरोबर वाहुन गेल्याचे दिसत आहे. कारण पावसाने पालिकेच्या कामाची पोलखोलच केली असून, पालिकेने केलेले काम निकृष्ट दर्जाचे होते यावर पावसाने शिक्कामोर्तब केले आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकासह शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी ज्या-ज्या रस्त्यांवर डांबरीकरण केले होते, त्यातील बहुतांशी रस्त्यांवरील डांबर पावसात वाहून गेली आहे.
महाबळेश्वरात नंदनवनात येणारे पर्यटक हे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकातून शहरात दाखल होतात किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून. या दोन्ही प्रमुख चौकांत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे पर्यटकांमध्ये संतापाची भावना असून, शहरातील नागरिक पालिकेच्या गलथान कारभाराची खिल्ली उडवत आहेत.