कांबळवाडी ते पॅरिस! झपाटलेल्या स्वप्नील कुसाळेची कहाणी

स्वप्नील कुसाळे हा खेळाडूंची खाण असलेल्या कोल्हापूर जिह्यातील आंतरराष्ट्रीय नेमबाज होय. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या छोट्याशा खेडेगावात 6 ऑगस्ट 1994 मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच स्वप्नवत होय. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला नेमबाजीसाठी प्रेरणा मिळाली. बिंद्राची अंतिम फेरी पाहण्यासाठी स्वप्नीलने त्यावेळी बारावीच्या परीक्षेचा पेपर बुडवला होता. त्यामुळे खेळासाठी झपाटलेल्या स्वप्नीलला वडिलांनी (सुरेश कुसाळे) 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले अन् तेथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

वडिलांनी काढले होते कर्ज

नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये इयत्ता नववीत असताना स्वप्नीलने पहिले राज्यस्तरीय सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हाच ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. त्याने इयत्ता आठवीच्या उन्हाळी सुट्टीपासून घेतलेली मेहनत आता कामी आली आहे. जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मजल मारली. नेमबाजी हा तसा खर्चिक खेळ होय, मात्र तरीही स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी त्याचे दडपण कधीच स्वप्नीलवर येऊ दिले नाही. 2012 मध्ये स्वप्नीलची जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदा निवड झाली होती. तेव्हा वडिलांनी दीड लाखाचे कर्ज घेऊन मुलाला जर्मनीला पाठवले. त्या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, पण त्याने पुन्हा कसून सराव केला आणि 2015 मध्ये 18 पेक्षा कमी वय असताना केरळमध्ये खुल्या गटात रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम करून दाखविला. त्याआधी 2013 मध्ये स्वप्नीलला लक्ष्य स्पोर्ट्सकडून स्पॉन्सरशिप मिळाली होती.

आई लोकनियुक्त सरपंच, वडील शिक्षक

स्वप्नीलने 2012 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करिअरला सुरुवात केली. त्याचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत आणि त्याची आई कांबळवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच होय. नववीत असताना स्वप्नीलला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि त्याने रायफल उचलली होती. पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्याने दहापैकी नऊ शॉट्स अचूक मारले. तेव्हा त्याला बंदूकही माहीत नव्हती, अशी आठवणही त्याच्या वडिलांनी सांगितली.

आंतरराष्ट्रीय पदकांचा प्रवास

स्वप्नील कुसाळेने 2015 मध्ये कुवेत येथे झालेल्या कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पटकाविले. त्यानंतर तुघलकबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 50 मीटर प्रोन प्रकारात तो विजेता ठरला. पुढे तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णवेध घेतला. दरम्यान, यापूर्वी 2022 मध्ये स्वप्नीलने 22 ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील कैरो इथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3-पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा मिळविला होता. 2023 मध्ये चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा, 2022 मध्ये बाकू येथील विश्वचषक आणि 2021 मध्ये नवी दिल्ली इथे नेमबाजीत स्वप्नील हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. याशिवाय त्याने 2015 ते 2023 या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धांत रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. स्वप्नीलला ऑलिम्पियन नेमबाज व प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचे मार्गदर्शन आहे.

सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्याकडून पाच-पाच लाखांचे बक्षीस जाहीर

कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडविल्याबद्दल आमदार सतेज पाटील तसेच आमदार ऋतुराज पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. शिवाय या दोघांनी स्वप्नीलच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याला प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. स्वप्नीलला 2021 मध्ये आम्ही ‘ब्रॅण्ड कोल्हापूर’ म्हणून सन्मानित केले होते, अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.