कोल्हापुरातील पूरस्थिती कायम, ‘राधानगरी’च्या तीन दरवाजांतून विसर्ग सुरूच

चार दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने जिल्ह्याला झोडपण्यास सुरुवात केली आहे. कालपासून पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे एकीकडे पुराचे पाणी ओसरत असतानाच धरणातील विसर्ग आणि जोरदार पावसामुळे नदीची पातळी संथगतीने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत आज सायंकाळी चार वाजेपर्यंत पंचगंगेची पाणीपातळी अवघ्या सहा इंचाने कमी झाली. 43 फूट धोकापातळी असलेल्या पंचगंगेची पाणीपातळी 42.5 फुटांवर स्थिर राहिली होती. त्यामुळे आठवडा झाला तरी जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही कायमच असल्याचे चित्र आहे.

राधानगरी धरणाचे  5, 6 आणि 7 क्रमांकांचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून, त्यातून 5784 क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी, धामणी, वारणा, कडवी, दूधगंगा,  वेदगंगा, हिरण्यकेशी तसेच ताम्रपर्णी नदीवरील एकूण 76 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. गेल्या चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 21.3 मि.मी. पाऊस झाला. त्यामध्ये गगनबावडा येथे 55.8 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 92.476 टीएमसी क्षमतेच्या धरणसाठ्यात एकूण 83.36 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कडवी, पाटगाव, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, कोदे ल.पा. ही मध्यम व लघु प्रकल्प धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर राधानगरी 98.96 टक्के, तुळशी 95.13, वारणा 86.28, दूधगंगा 87.72, कासारी  87.97, कुंभी 88.53, चिकोत्रा 95.57, तर सर्फनाला धरण प्रकल्पात 71.06 टक्के पाणीसाठा आहे.

राधानगरी धरणातून 5784 क्युसेकने विसर्ग सुरू आहे, तर तुळशी 1500, वारणा 11585, दूधगंगा 9100, कासारी 520, कडवी 720, कुंभी 300, पाटगाव  2555, चिकोत्रा 100, चित्री 531, जंगमहट्टी 335, घटप्रभा 5596, जांबरे 833, आंबेओहोळ 110 आणि सर्फनालामधून 669 क्युसेकने विसर्ग सुरू होता.