
कधी पादचाऱ्यांच्या हातातले मोबाईल हिसकावून तर कधी फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेऊन पसार होणाऱ्या दोघा चोरांना अॅण्टाप हिल पोलिसांनी पकडले आहे. त्यातील एक अल्पवयीन मुलगा असून त्यांच्याकडून पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
अॅण्टॉप हिलच्या कोकरी आगार येथील एका घरात घुसून मोबाईलची चोरी झाल्याने त्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी मदने व त्यांचे पथक गुह्याचा शोध घेत होते. दरम्यान सिजीएस कॉलनी येथील गरीब नवाज नगरात राहणारा एक तरुण सतत वेगवेगळे मोबाईल वापरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बंगाली पुरा येथून विकास इंगळे (19) याला उचलले. त्याने चौकशीत गुह्याची कबूली दिली.
तसेच वांद्रे व अंधेरी येथेही मोबाईल चोरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यांनी केलेले मोबाईल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले. दुचाकीवरून पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणे, तर कधी फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल मागून पळून जाणे अशी त्यांची गुह्यांची पद्धत असल्याचे सांगण्यात येते.