
संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत करण्यात आलेल्या अश्लाघ्य टीकेने संगमनेरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. या सर्व घडामोडींतून आमदार थोरात समर्थक आणि डॉ. जयश्री थोरात यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा संतापाची लाट उसळली असून, हा प्रकार म्हणजे ज्याच्यावर अन्याय, त्याच्यावरच गुन्हा दाखल, असा झाला असल्याचा आरोप थोरात समर्थकांनी केला आहे. याबाबत संगमनेर तालुक्यातील शेकडो महिलांनी एकत्र येत आज प्रांत कार्यालय आणि संगमनेर शहर पोलिसांना निवेदन दिले.
विखे-पाटील समर्थक कार्यकर्त्यांवर गाडय़ा अडवून हल्ला करण्यात आल्याचा आणि जाळपोळ केल्याचा गुन्हा थोरात समर्थकांवर दाखल करण्यात आला आहे. या गुह्यामध्ये आमदार थोरात यांच्या चुलत बंधूंसह पक्षाच्या पदाधिकाऱयांची नावे आहेत.
या संदर्भात अशोक बाबूराव वालझाडे (रा. निमोण, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माजी खासदार डॉ. सुजय विखे यांची धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर निमोणकडे जात असताना, त्यांच्या गाडय़ा अडवून स्कार्पिओ गाडी (एमएच 17 बीव्ही 4737) हिच्यावर पेट्रोल शिंपडून त्यातील लोकांना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सदर गाडी जाळून टाकण्यात आली. तसेच इर्टिगा गाडी (एमएच 17 सीआर 8510) या गाडीवर कुऱहाड, लोखंडी रॉड, काठी यांनी हल्ला करून काचा, हेडलॅम्प, आरसा यांची तोडफोड करण्यात आली. तसेच गाडीतील तक्रारदार आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.
या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू आणि संगमनेर साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह भास्कर खेमनर, सुरेश थोरात, सुरेश सांगळे, शाबीर शफिक तांबोळी, सिद्धार्थ थोरात, गोरक्ष घुगे, वैष्णव मुर्तडक, निखिल पापडेजा, शेखर सोसे, शरद पावबाके, सौरभ कडलग, हर्षल राहणे, सचिन दिघे, अनिल कांदळकर, विजय पवार, निखिल कातोरे, गौरव डोंगरे, अजय फटांगरे, शुभम घुले, शुभम जाधव, शुभम पेंडभाजे, भगवान लहामगे, रावसाहेब थोरात, भरत कळसकर यांच्यासह वीस ते पंचवीस अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दुसरीकडे संगमनेर तालुका पोलीस स्टेशन कार्यालयाबाहेर गैरकायद्याची मंडळी जमवून जमावबंदी असतानादेखील सभा घेतली म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह डॉ. जयश्री थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, विश्वास मुर्तडक, इंद्रजीत थोरात, शरयू देशमुख, सुरेश थोरात, प्रभावती घोगरे, सचिन गुजर, बाबा ओहोळ, सीताराम राऊत, उत्कर्षा रुपवते, बाळासाहेब गायकवाड, हेमंत ओगले, करण ससाणे, दीपाली ससाणे, अमर कतारी, अशोक सातपुते, माधवराव कानवडे, इंद्रजीत खेमनर, सचिन खेमनर, राजाभाऊ खरात, सचिन चौगुले, सचिन दिघे आणि इतर 20 ते 25 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्याय झाला तिच्यावरच गुन्हा, वा रे कायदा; शेकडो महिलांनी पोलिसांना दिले निवेदन
संगमनेर धांदरफळ येथील सुजय विखे-पाटील यांच्या सभेमध्ये युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे वसंत देशमुख व महायुतीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असताना जयश्री थोरात आणि समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे तीक्र संताप व्यक्त होत आहे. ‘जिच्यावर अन्याय झाला तिच्यावरच गुन्हा, वा रे कायदा’, असा संताप व्यक्त करत शेकडो महिलांनी आज पोलिसांना निवेदन दिले.
डॉ. जयश्री थोरात आणि दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून पायी जात संगमनेर पोलिसांना निवेदन दिले. यावेळी शेकडो महिलांनी पोलिसांना कारवाईवर संताप व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करा आणि खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी केली. गुन्हे मागे घेतले नाही तर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा महिलांनी दिला आहे.
मणिपूर, बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती – दुर्गा तांबे
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर सर्व जमलो होतो. मागणी कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने होती. अशावेळेस गुन्हे दाखल कसे होतात? येथे कायद्याचे राज्य शिल्लक आहे की नाही, हाच प्रश्न आहे. मणिपूर आणि बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती झाली असल्याची टीका त्यांनी केली.
माझी बदनामी होऊनही माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा – जयश्री थोरात
माझी बदनामी करून माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडय़ा जाळल्या; वाहने तोडली, फलक जाळले, याप्रकरणी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गाडय़ा, वाहने दुरुस्त करता येतील, नव्या घेता येतील; परंतु महिलांची काढलेली अब्रू परत मिळत नाही, अशी खंत डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केली.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांच्या वक्तव्याने समस्त महिला वर्गाची बदनामी झाली. मात्र, सरकारचा उलटा न्याय आहे. सरकार कोणाच्या दबावाखाली काम करतेय? महिलांना अपशब्द बोलून, महिलांची बदनामी करून त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा सरकारचा हा न्याय कुठला आहे, असा खडा सवाल थोरात यांनी केला. दरम्यान, मला अटक करा; पण आमच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी केले असून, महाराष्ट्रात मुली आणि बहिणी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.
तमाम महिला-भगिनींचा अपमान करणारे बेताल वक्तव्य महायुतीचे पदाधिकारी करत होते आणि अनेकजण टाळ्या वाजवत होते. हे महाराष्ट्राला शोभते आहे का? असा सवाल करीत अशा विकृत माणसांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणे गरजेचे होते. ते सोडून माझ्यासह कार्यकर्त्यांवर राजकीय सूडभावनेतून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, हा कुठला न्याय आहे, असा संताप डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केला.
झुल घातली म्हणून मांजर टायगर होत नाही – खासदार लंके
थोरात घराणे हे महाराष्ट्रातील सुसंस्कृत घराणे आहे. त्यांच्या कुटुंबातील मुलीबद्दल बेताल वक्तव्य करणे, ही महाराष्ट्राला कलंकित करणारी दुर्दैवी घटना आहे, असे सांगत अंगावर वाघाची झुल घातली म्हणून मांजर टायगर होत नाही, अशी टीका खासदार नीलेश लंके यांनी केली. दक्षिणेत मतदारांनी दडपशाही करणाऱयांची जिरवली आहे, असेही ते म्हणाले.
वसंत देशमुखांना पुणे जिह्यातून घेतले ताब्यात
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वसंत देशमुख यांना पुणे जिह्यातून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्यापासून वसंत देशमुख फरार होते. भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य टीकेवरून राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तेव्हापासून वसंत देशमुख हे फरार होते. आज अहिल्यानगर पोलिसांनी पुणे जिह्यातून त्यांना ताब्यात घेतले आहे.