दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या विमानाचे इमरजन्सी लँडिंग, 202 प्रवाशांचा जीव टांगणीला

दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाची सोमवारी लखनऊच्या के चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमान तळावर इमरजेन्सी लँडिंग करण्यात आली. दोनदा लॅण्डीगचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर विमान वाराणसीकडे वळवण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र कमी इंधनामुळे तसे करण्याची परवानगी मिळू शकली नाही. त्यानंतर विमानाला लखनऊ विमानतळावर उतरवण्यात आले. त्यावेळी विमानात 202 प्रवासी प्रवास करत होते.

एअर इंडियाचे विमान एआय 431 ने सोमवारी दिल्लीहून 12.37 वाजता लखनऊसाठी उड्डाण केले होते. हे विमान लखनऊ विमानतळाजवळील जवळपास 26 मिनीटे उशीराने 1.56 मिनीटांनी उतरले. हे विमान दिल्लीहून लखनऊला पोहोचले आणि दोनदा लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र अयशस्वी ठरला. त्यानंतर विमानाला वाराणसीकडे वळवण्याबाबत बोलण्यात आले. त्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि इंधनाबाबत माहिती घेतली असता वाराणसीला जाण्यासाठी विमानात इंधन नसल्याचे समोर आले.

सूत्रांचे म्हणणे आहे की, यानंतर विमानाने पुन्हा प्रदक्षिणा घालून विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी अनेक विमाने लँडिंगसाठी रांगेत उभी होती. यानंतर ही माहिती एटीसीला देण्यात आली आणि कमी इंधनामुळे विमानाचे लखनऊ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यासंदर्भात विमानतळ प्रशासन कोणतीही माहिती देण्यास नकार देत आहे. सुत्रांनी सांगितले की, विमानाच्या लॅण्डिंगचा हा प्रयत्न दोन वेळा अयशस्वी ठरल्यानंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवासी घाबरले होते. त्यानंतर वाराणसीलाही विमानाचे लँडिंग करता आले नाही. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर जेव्हा विमानतळावर विमान उतरविण्यात आले त्यावेळी प्रवाशांच्या जीवात जीव आला.