फॉलोऑन टाळण्याचाही आनंद मावेना! आकाशदीप-बुमराने जिवात जीव आणला

गॅबावर चाचपडत असलेल्या हिंदुस्थानी संघाने आज चक्क फॉलोऑन टाळण्याचा आनंद साजरा केला. जसप्रीत बुमरा आणि आकाशदीप या शेवटच्या जोडीच्या झुंजार खेळाच्या जोरावर हिंदुस्थानने फॉलोऑनचे संकट टाळले असले तरी पराभवाचे संकट मात्र कायम आहे. सोबत फॉलोऑन टाळल्यामुळे टेस्टमध्ये ट्विस्ट आला आहे. कसोटी रंगतदार अवस्थेकडे झुकली असून शेवटच्या दिवशी विजय मिळवण्याची संधी दोन्ही संघांना लाभलीय. गॅबावर ताबावर मिळवण्यासाठी बुधवारी कसोटीला टी-20 चा तडका मारला जाण्याची शक्यता असल्यामुळे फटकेबाजीचे रंग उधळले जाणार हे निश्चित. फक्त पावसाने थोडीशी विश्रांती घ्यायला हवी.

कसोटीचा तब्बल दीड दिवस पावसामुळे वाया गेला. त्यातच ऑस्ट्रेलियाने 445 धावांचा डोंगर उभारल्यानंतर सोमवारी त्यांनी हिंदुस्थानची 4 बाद 51 अशी दयनीय अवस्था करत कसोटीवर आपली पकड मजबूत केली होती. मात्र आज पावसाने वारंवार खेळात व्यत्यय आणल्यामुळे तब्बल 30 षटकांचा खेळ वाया गेला. तसेच के. एल. राहुल आणि रवींद्र जाडेजा यांच्या चिवट खेळानंतर बुमरा-आकाशदीपच्या झुंजार खेळाने हिंदुस्थानचा फॉलोऑन टाळला. फॉलोऑनची नामुष्की टाळल्यामुळे हिंदुस्थानवर असलेले पराभवाचे संकटही लांबले आहे.

आनंद गगनात मावेना

हिंदुस्थानवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली असती तर ऑस्ट्रेलियाने गॅबावर खऱया अर्थाने ताबा मिळवला असता. त्यांनी हिंदुस्थानचा डावाने पराभवही केला असता. पण आकाशदीप-बुमराच्या भागीने ऑस्ट्रेलियाचा तो आनंद हिरावून घेतला असला तरी फॉलोऑन टाळणाऱया त्या चौकारामुळे क्रिकेटप्रेमींचाच नव्हे तर हिंदुस्थानी खेळाडूंचा विशेषतः कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जणू हिंदुस्थानने पराभवच टाळला, असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱयावर ओसंडून वाहत होता.

गॅबावर ताबा पावसाचा की…

हिंदुस्थानने फॉलोऑन टाळल्यामुळे आता ऑस्ट्रेलियालाच फलंदाजीला यावे लागणार आहे. अद्याप हिंदुस्थान 193 धावांनी पिछाडीवर असून शेवटच्या दिवशी बुमरा-आकाशदीप जोडी पिछाडी किती भरून काढतात ते महत्त्वाचे आहे. मात्र त्यानंतर फलंदाजीला येणारा ऑस्ट्रेलियन संघ टी-20 ची फटकेबाजी करत पहिल्या सत्रात 100-150 धावा चोपून काढण्याचे ध्येय समोर ठेवूनच मैदानात उतरेल आणि हिंदुस्थानला दोन सत्रांत 275-300 धावांचे आव्हान देईल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया समोर केवळ विजय आणि अनिर्णित हेच दोन गोष्टी असतील. परिणामतः हिंदुस्थानसमोर पराभवाचे संकट किंवा सामना अनिर्णित राखण्याचे आव्हान उरलेले असेल. हिंदुस्थानला गॅबा जिंकण्यासाठी शेवटच्या जोडीने धावसंख्येत आणखी किमान 50 धावांची भर घालावी लागेल आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव शंभरीत गुंडाळण्यात यशस्वी ठरले तरच हिंदुस्थानचा संघ विजयाचा चमत्कार घडवू शकतो, पण तूर्तास हे कठीण वाटतेय. या निकालात पावसाचीही भूमिका महत्त्वाची असेल.

रोहितचा निराशेचाच खेळ

दुसऱया कसोटीपासून हिंदुस्थानी संघात परतलेल्या रोहित शर्माने पुन्हा एकदा निराशेचाच खेळ केला. गेल्या कसोटीत 3 आणि 6 धावा करणाऱया रोहितने आजही केवळ 10 धावा करत आपल्या अपयशाची मालिका कायम राखली आहे. आधी सलामीला अपयशी ठरत असलेल्या रोहितने सहाव्या क्रमांकावर खेळतानाही तोच खेळ कायम ठेवला आहे. विराट आणि रोहितच्या फलंदाजीतल्या दारुण अपयशामुळे हिंदुस्थानची फलंदाजी अक्षरशः कमकुवत झाली आहे.

फॉलोऑननेही चुकवले हृदयाचे ठोके

पावसाच्या व्यत्ययामुळे आज हिंदुस्थानला फायदा तर ऑस्ट्रेलियाचे नुकसान झाले. 74 धावांत हिंदुस्थानचा अर्धा संघ गारद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कसोटीवर आपली पकड अधिक मजबूत केली होती. हिंदुस्थानचा उर्वरित संघही लवकर गुंडाळून फॉलोऑन लादण्याचे ऑस्ट्रेलियाचे मनसुबे होते. पण सातव्या क्रमांकावर आलेल्या रवींद्र जाडेजाने के. एल. राहुलच्या साथीने 67 धावांची भागी रचत संघाला स्फूर्ती दिली. राहुलची धीरोदात्त खेळी 84 धावांवर संपली. पुढे जाडेजाने नितीश कुमार रेड्डीसह 53 धावांची भर घालत संघाला दोनशेसमीप नेले. जाडेजाने 77 धावांची खेळ करताना संघाचा फॉलोऑन टाळण्यासाठी निकराची झुंज दिली, पण तो बाद झाला तेव्हा हिंदुस्थानचे फॉलोऑन जवळजवळ निश्चित झाले होते.

हिंदुस्थान फॉलोऑनपासून

33 धावा दूर होता आणि शेवटची जोडी मैदानात होती. तेव्हा आकाशदीपने बुमराच्या साथीने केलेला खेळ अद्भुत ठरला. दोघे मैदानात असताना ऑस्ट्रेलियाचे एकमेव ध्येय फॉलोऑन देण्याचे होते, पण दोघांनी अनपेक्षित खेळ करत एकेरी-दुहेरी धावा काढत संघाला तारले. त्यांची प्रत्येक धाव क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकवणारीच होती. 9 बाद 242 अशा स्थितीत असताना आकाशदीपने पॅट कमिन्सला ठोकलेल्या खणखणीत चौकाराने स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. कारण हा चौकार फॉलोऑन टाळणारा होता. मग एक चेंडू सोडून मारलेला उत्तुंग षटकार आनंद साजरा करायला लावणारा होता. त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आकाशदीप 27 तर बुमरा 10 धावांवर खेळत होता.