Mumbai News – ताडदेवमध्ये दोन बाईकची समोरासमोर टक्कर, एक ठार; एक गंभीर जखमी

मुंबईतील ताडदेव परिसरात दोन बाईकची समोरासमोर टक्कर झाल्याने अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सागर दिलीप वाकचौरे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर मंथन असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मयत सागर हा भाचा मंथनसह गुरुवारी मध्यरात्री बाईकवरून तुळशीवाडी परिसरात पान खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी भाटिया रुग्णालयाजवळ त्यांच्या बाईकला दुसऱ्या बाईकने जोरदार टक्कर दिली.

धडक इतकी भीषण होती की बाईक चालवत असलेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला मंथन गंभीर जखमी झाला. मंथनला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.