नितीशकुमार, वॉशिंग्टन बनले संकटमोचक! बॉक्सिंग डे कसोटीत रेड्डीचे शतक; सुंदरचे अर्धशतक

बॉक्सिंग डे कसोटीत ज्या मेलबर्नच्या खेळपट्टीवर हिंदुस्थानचे रथी-महारथी फलंदाज फ्लॉप ठरले, त्याच खेळपट्टीवर नवखा नितीशकुमार रेड्डी व वॉशिंग्टन सुंदर हे संकटमोचक ठरले. नितीशकुमारने नाबाद शतक ठोकले, तर वॉशिंग्टनने संयमी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा समर्थपणे प्रतिकार करीत चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानला पहिल्या डावात 116 षटकांत 9 बाद 358 धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपला तेव्हा नितीशकुमार 105, तर मोहम्मद सिराज 2 धावांवर खेळत होते, मात्र हिंदुस्थानचा संघ पहिल्या डावात अजूनही 116 धावांनी पिछाडीवर आहे.

पंत-जाडेजा जोडीची निराशा

ऑस्ट्रेलियाच्या 474 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानची दुसऱ्या दिवशी 5 बाद 164 अशी दुर्दशा झाली होती. अशा अवस्थेत हिंदुस्थानने शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र ऋषभ पंत (28) व रवींद्र जाडेजा (17) या भरवशाच्या जोडीतील कोणीच मोठी खेळी करू शकले नाही. स्कॉट बोलॅण्डने पंतला लॉयनकरवी झेलबाद केले, तर जाडेजाला लॉयनने पायचीत पकडले. हिंदुस्थानचा डाव जेमतेम अडीचशेपर्यंत संपेल असे वाटत होते.

रेड्डी-वॉशिंग्टनची सुंदर फलंदाजी

हिंदुस्थानचा डाव संकटात असताना नव्या दमाचा फलंदाज नितीशकुमार रेड्डी व वॉशिंग्टन सुंदर या जोडीने आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झुंज दिली. रेड्डीने 176 चेंडूंत 10 चौकार व एका षटकारासह नाबाद 105 धावांची खेळी करीत कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक साजरे केले. वॉशिंग्टन सुंदरने 162 चेंडूंतील संयमी खेळीत 50 धावांची खेळी करताना केवळ एक चेंडू सीमापार धाडला. शेवटी नाथन लॉयनने वॉशिंग्टन सुंदरला पायचीत पकडून ही जोडी फोडली. मग कर्णधार कॅट कमिन्सने आलेल्या जसप्रीत बुमराला ख्वाजाकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला नववे यश मिळवून दिले. आता अखेरची जोडी उद्या रविवारी सकाळी हिंदुस्थानसाठी आणखी किती धावा जमवते ते बघावे लागेल. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स व स्कॉट बोलॅण्ड यांनी 3-3 फलंदाज बाद केले, तर नाथन लॉयनने 2 विकेट घेतल्या.

नितीशकुमारची वॉन, गेल यांच्याशी बरोबरी

नितीशकुमार रेड्डीने बॉक्सिंग डे कसोटीत शतक ठोकताना एक षटकार लगावला. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील त्याचा हा आठवा षटकार होय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत लगावलेल्या सर्वाधिक षटकारांची नितीशकुमारने बरोबरी केली. याचबरोबर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत आठ षटकार लगावणारा नितीशकुमार रेड्डी हा हिंदुस्थानचा पहिला फलंदाज ठरला. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या देशात कसोटी मालिकेत केवळ दोनच फलंदाज इतके षटकार लगावण्यात यशस्वी ठरले आहेत. 2002-03 च्या ‘अ‍ॅशेस’ मालिकेत इंग्लंडच्या मायकेल वॉनने 8 षटकार लगावले होते, तर वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने 2009-10 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एका कसोटी मालिकेत इतके षटकार मारले होते. आता नितीशकुमार रेड्डीने हा पराक्रम केला आहे. मात्र नितीशकुमार रेड्डीला आता या यादीत आघाडीवर राहण्याची संधी आहे. या डावात आणखी एक षटकार ठोकताच तो या दोन्ही महान खेळाडूंना मागे टाकू शकतो.

ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक ठोकणारे सर्वात तरुण हिंदुस्थानी खेळाडू

  • 18 वर्षे 256 दिवस – सचिन तेंडुलकर, सिडनी 1992
  • 21 वर्षे 92 दिवस – ऋषभ पंत, सिडनी 2019
  • 21 वर्षे 216 दिवस – नितीशकुमार रेड्डी, मेलबर्न 2024
  • 22 वर्षे 46 दिवस – दत्तू फडकर, अ‍ॅडलेड 1948

नितीशकुमारने 76 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

नितीशकुमार रेड्डी हा ऑस्ट्रेलियात कसोटी शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण हिंदुस्थानी फलंदाज ठरला. 21 वर्षे आणि 216 दिवस इतके वय असलेल्या नितीशकुमारने 76 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. 1948 मध्ये अॅडलेड कसोटीत वयाच्या 22 वर्षे 46 दिवसांत कसोटी शतक झळकावणाऱ्या दत्तू फडकरला त्याने मागे टाकले. नितीशपेक्षा वयाने लहान असलेल्या दोनच खेळाडूंनी आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली आहेत. या यादीत बांगलादेशचा अबुल हसन (20 वर्षे 108 दिवस) आणि हिंदुस्थानचा अजय रात्र (20 वर्षे 150 दिवस) यांचा समावेश आहे.