
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत पंढरपुरात विधायक पद्धतीने करण्यात आले. तब्बल 175 रक्तदात्यांनी रक्तदान करून थर्टी फर्स्ट साजरा करत नवीन वर्षाचे स्वागत केले. श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपुरकर मित्र परिवाराच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून रक्तदानाची चळवळ थर्टी फर्स्ट रोजी चालवली जाते.
श्याम गोगाव आणि माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या एन आय टी मित्र परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी थर्टी फर्स्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाच्याही वर्षी थर्टी फर्स्ट दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली. तब्बल 175 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह भेट देण्यात आली.
रक्तदान केल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील 48 तास कुठल्याही प्रकारचे व्यसन अथवा मद्य घेता येत नाही. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या दिवशी पार्टी, डीजे अशा गोष्टींना फाटा देत विधायक पद्धतीने व्यसनमुक्त पिढी घडवण्याचा संकल्प श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपूरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी शतकवीर रक्तदाते रवींद्र भिंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे, माजी उप नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या हस्ते झाले. तर युवक नेते प्रणव परिचारक यांनी शिबिराला भेट दिली. तसेच राष्ट्रवादीचे सुधीर भोसले, सौदागर मोलक, एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिवसभरात विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळीनी या शिबिरास भेटी देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. या शिबिरासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला यांचे सहकार्य लाभले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री श्याम गोगाव, आदित्य फत्तेपूरकर, विठ्ठल कदम, बाहुबली गांधी, महेंद्र जोशी, धनंजय मनमाडकर, सत्यवान दहिवाडकर, गणेश पिंपळनेरकर, अमित करंडे, गणेश जाधव, अमोल आटकळे, संतोष शिरगिरे, दत्ता पवार, विशाल पावले आदी मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.
























































