
हिंदुस्थानी महिलांनी आयर्लंडचा दुसऱया सामन्यात 116 धावांनी धुव्वा उडविला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी आधीच खिशात टाकली. जेमिमा रॉड्रिग्जचे (102) शतक आणि कर्णधार स्मृती मानधना (73), प्रतिका रावल (67) व हर्लिन देओल (89) यांची दणकेबाज अर्धशतके ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 371 धावांच्या कठिण लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला 7 बाद 254 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून क्रिस्टीना कुल्टर रेली हिने सर्वाधिक 80 धावा केल्या.
हिंदुस्थानची ऐतिहासिक धावसंख्या
जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर हिंदुस्थानने ऐतिहासिक कामगिरी केली. आयर्लंडविरुद्ध दुसऱया सामन्यात हिंदुस्थानने 50 षटकांत 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 370 धावांचा डोंगर उभारला. महिला वन डेमधली ही हिंदुस्थानची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी 2017 मध्ये हिंदुस्थानने बडोद्यात आयर्लंडविरुद्ध दोन विकेट गमावून 358 धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडने 2018 मध्ये 491 धावा केल्या होत्या.



























































