वक्फ विधेयकाचा मसुदा जेपीसीने स्वीकारला, बिगरमुस्लिम सदस्य असणार

प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकाचा मसुदा जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीने आज बहुमताने स्वीकारला. 15 जणांनी विधेयकाच्या बाजूने तर 11 जणांनी विरोधात मतदान केले. संयुक्त संसदीय समितीच्या आजच्या शेवटच्या बैठकीत विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यासाठी मतदान घेण्यात आले. दरम्यान, 655 पानांचा मसुदा वाचण्यासाठी आणि त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी अतिशय कमी वेळ दिल्याचा आरोप विरोधकांनी केला.

दोन्ही सभागृहांचे एकूण 31 खासदार या संयुक्त संसदीय समितीत आहेत. त्यापैकी 16 एनडीए (12 भाजपा) तर 13 खासदार विरोधी पक्षातील आहेत. एक खासदार वायएसआरसीपी पक्षाचा तर एक खासदार नामनिर्देशित आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या बैठकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाने सुचविलेल्या 14 सूचना समितीने स्वीकारल्या, तर विरोधकांनी सुचविलेल्या 44 सूचना फेटाळल्या होत्या.

संविधानाच्या विरोधात जाऊन सुधारणा – शिवसेना

विरोधकांबद्दल जे काही बाहेर पसरवले जात आहे ते आधी थांबायला हवे. संविधानाच्या विरोधात जाऊन काही सुधारणा केल्या गेल्या आहेत. म्हणूनच आम्ही मसुद्याचा विरोध केला होता, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.जर वक्फ बोर्डावर बिगरमुस्लिमांना घेतले गेले तर उद्या हिंदूंच्या कायद्यातही बदल केली जाण्याची शक्यता आहे, असे अरविंद सावंत म्हणाले.